नवी दिल्ली/पुणे : केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्विकारताच मुरलीधर मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये असून पुण्याच्या प्रश्नांबाबत त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत नवे टर्मिनल कार्यान्वित करणे, अपघातग्रस्त विमान ‘बे’वरून हटविणे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा निधी पुणे महापालिकेला मिळवून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
मोहोळ यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर २४ तासांच्या आत पुण्याशी निगडित तीन महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा काढला. शाह यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांनी अनेक दिवस प्रलंबित असलेले पुण्याचे नवे टर्मिनल कार्यान्वित करणे, अपघातग्रस्त विमान ‘बे’वरून हटविणे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा निधी पुणे महापालिकेला मिळवून देण्यासंदर्भातील प्रश्न मांडले. त्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर शाह यांनी तातडीने या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन मोहोळ यांना दिले.
याबाबत अधिक माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल लवकरच सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली असून आवश्यक असलेल्या आणि गृहमंत्रालयाच्या अखत्यारितील सीआयएसएफच्या मनुष्यबळाची पूर्तता लवकरच करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला आहे. यामुळे नवे टर्मिनल सुरू करण्याला गती प्राप्त झाली आहे. हे टर्मिनल लवकर सुरू करून पुणेकर प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.’
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ पुढे म्हणाले, ‘पुणे शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून येणारा निधी गेली काही काळ प्रलंबित होता. शाह यांच्या गृहमंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापानातून मिळालेल्या या निधीतून शहरभर विविध कामे केली जाणार आहेत. शहरातील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन व पूर नियंत्रणासाठी हा निधी तत्काळ मिळावा, अशी मुद्दा बैठकीत मांडला असता त्यावरही शाह यांनी सकारात्मकता दर्शवली आणि तातडीने निधी वर्ग केला जाईल, असे सांगितले’
‘बे’वर रखडलेल्या ‘त्या’ विमानाचा प्रश्नही लवकरच मार्गी !
‘पुणे विमानतळाच्या ‘बे’वर एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान जागेवर उभे असल्याने त्याचा ताण इतर विमानांच्या प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. शिवाय ही बे वापरात नसल्यामुळे विमानांचे वेळापत्रक कोलमडत असल्याचे चित्र आहे. हे विमान दुरुस्तीसाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता असून, ते विमान तात्पुरत्या स्वरुपात संरक्षण दलाच्या जागेवर हलविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्त विमान संरक्षण दलाच्या जागेत लावण्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा झाली आहे,’ अशी माहितीही मोहोळ यांनी दिली.
घर ताज्या बातम्या पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात मोहोळांची गृहमंत्री शाह यांच्याशी चर्चानवे टर्मिनल लवकर होणार कार्यान्वित