पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत तीन बालकांची क्वाक्लिर इंप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्या तिघांचा श्रवणदोष दूर झाला आणि आपली हाक बालकांनी ऐकली, याचा अपार आनंद त्यांच्या मातांना झाला.
कु.मायरा गौरव गार्डीक वय २ वर्ष राहणार मळद दौंड तसेच कु.आरव आनंद डमरे वय २ वर्ष कोथरुड पुणे आणि कु.यशश्री अतुल सावंत वय ३ वर्ष राहणार मोरगाव बारामती येथे राहत असून हे तिघांनाही जन्मजात श्रवणदोष होता म्हणून त्यांना ऐकुही येत नव्हते त्यामुळे त्यांना बोलताही येत नव्हते. परंतु त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेवून बालकांची श्रवण तपासणी करुन घेतली तरी त्या तपासणी रीपोर्टनुसार डॉक्टरांनी क्वाक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला दिला या शस्त्रक्रियेकरीता प्रत्येकी किमान ८ ते १० लाख इतका खर्च अपेक्षित होता. हा खर्चाचा बोजा हलका व्हावा याकरिता दगडूशेठ ट्रस्ट्च्या जय गणेश रुग्णसेवा अभियानाद्वारे त्यांना ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर येथे मोफत शस्त्रक्रिया करून देण्यासाठीचे पत्र देण्यात आले. त्यानुसार बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलने, दगडूशेठ ट्रस्टचे पत्र स्वीकारुन त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि फेब्रुवारी महिन्यात या तीन बालकांची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली. हॉस्पिटलचे सीईओ डॉ.राजेंद्र पाटणकर आणि त्यांचे सहकारी यांचे त्यांना सहकार्य लाभले.
हॉस्पिटलमधून बालकांना घरी जाण्याची परवानगी मिळाल्या नंतर तिघाही बालकांच्या पालकांनी आपल्या बालकांसह दगडूशेठ गणपती मंदिरात येऊन बाप्पाची आरती करुन कृतज्ञता व्यक्त केली. तसेच ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आणि विश्वस्त, जय गणेश रुग्ण सेवा अभियानाचे पदाधिकारी यांचे आभार मानले.
तिघाही बालकांचा श्रवणदोष ट्रस्टच्या माध्यमातून दूर झाला. त्यांच्या परिवाराच्या आनंदात आम्हीही सर्वजण सहभागी आहोत, अशी भावना ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी व्यक्त केली.