सुस :यश्विन 2.0 सोसायटीमध्ये विजयादशमी (दसरा) चा सण अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक थाटात साजरा करण्यात आला. पारंपरिक व आधुनिकतेचा संगम साधणाऱ्या या कार्यक्रमांनी सोसायटीतील नागरिकांना एक अविस्मरणीय अनुभव दिला.
दसरा च्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याची सुरुवात शस्त्रपूजनाने झाली, ज्यात महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत धर्म, पराक्रम आणि न्याय यांचा सन्मान केला. त्यानंतर लहान मुलांनी आणि किशोरवयीनांनी सादर केलेल्या रामायण अॅक्ट मध्ये राम-रावण युद्ध, सीतेचं अपहरण आणि लंकेचा संहार या प्रसंगांनी उपस्थितांची मने जिंकली.
विशेष आकर्षण ठरले ते ‘दुर्गे दुर्गती नाशिनी’ या भक्तिगीतावर सादर केलेले नृत्यनाट्य, ज्यात महिलांनी एकतानतेने आणि उर्जेने देवीचे रूप रंगवले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने रावण दहन करण्यात आले, ज्यात वाईटावर चांगल्याचा विजय हे प्रतीक अधोरेखित झाले.
कार्यक्रमांचे आयोजन संपूर्णपणे सोसायटीतील रहिवाशांनी स्वयंप्रेरणेने केले होते. मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी यात सहभाग घेतल्याने सोसायटीमध्ये एकतेचा, सौहार्दाचा आणि सांस्कृतिक जाणीवेचा प्रेरणादायी अनुभव निर्माण झाला.
असा सण साजरा करताना केवळ मनोरंजन होत नाही, तर आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची जपणूक होते. एकत्र येऊन साजरे केलेले हे क्षण कायम लक्षात राहतील, असे सोसायटीतील नागरिकांनी सांगितले. विशेषतः मुलांसाठी ही एक शिकवणूक ठरली, जिथे त्यांनी भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या कथा समजून घेतल्या.
आयोजक समितीकडून विशेष आभारकार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक सदस्याचे आयोजकांनी आभार मानले आहेत. पुढील काळात अशा अनेक उपक्रमांची आखणी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले, अशी माहिती राघवेंद्र देशपांडे यांनी दिली आहे.
























