राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क, सज्ज रहावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ०८: राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

राज्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव डॉ.आय.एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की राज्यासह मुंबईत पाऊस सुरु आहे. एकत्रित मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने राज्यात काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी सर्व जिल्हास्तरावरील टीम एकत्रित काम करत आहेत. या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा प्रभावित झालेली आहे. लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एसटीसह बेस्टच्या सेवा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याकरिता मुंबई महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पावसामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी केले.

See also  महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाचे माजी महापौर उषाताई ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन