उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे शहर पोलिस मुख्यालयातील सीसीटिव्ही कमांड कंट्रोल रुमला भेट

पुणे, दि. २५ : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर पोलिस मुख्यालयातील सीसीटिव्ही कमांड कंट्रोल रुमला भेट देवून  शहरातील पूरबाधित परिसराची माहिती घेतली. पोलिस विभागाने आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कमांड कंट्रोल रुम, नियंत्रण कक्ष व संवाद कक्षातील सीसीटिव्हीच्या माध्यमातून शहरातील बाधित झालेल्या ठिकाणची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त प्रवीण पाटील, मनोज पाटील यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, रात्री पाऊस झाला तर पाणी साठवण्यासाठी खडकवासला धरणात जागा ठेवावी. त्यासाठी धरणाचा पाणीसाठा नियंत्रित ठेवावा. मदत व बचाव कार्यास अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता शक्यतो धरणातून दिवसा पाण्याचा विसर्ग वाढवावा. धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग नियंत्रित करून पूर नियंत्रणाचे प्रयत्न करावेत.

पवना धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू ठेवावा. पुरबाधित परिसरातील नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे.  गृहनिर्माण संस्थातील नागरिकांना आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे. स्थलांतंरीत नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी श्री. पवार यांनी नियंत्रण कक्षामधून चऱ्होली येथील बाधित परिसराची माहिती घेतली. पिंपरी चिंचवड महपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडूनही त्यांनी दूरध्वनीद्वारे आपत्ती व्यवस्थापनाची माहिती घेतली. बचाव कार्य व मदतीसाठी पुरेसे मनुष्यबळ तैनात करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

श्री.पवार यांनी संवाद कक्षातील सीसीटिव्ही यंत्रणेद्वारे एकता नगर, शिवाजी पुल, चऱ्होली, चांद तारा चौक व इतर ठिकाणची माहिती घेतली. यावेळी पोलीस आयुक्त श्री. कुमार यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

See also  पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण