पुणे – मुठा नदीकाठच्या पूरग्रस्तांना राज्य सरकारने ५हजाराची अपुरी मदत न देता नुकसानीच्या प्रमाणात भरीव मदत द्यावी, आणि मदतीचे वाटप त्वरीत व्हावे, अशी मागणी माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.
गेल्या आठवड्यात संततधार पावसामुळे नदीला पूर आला. पुराचे पाणी नदीकाठच्या वसाहती, वस्त्या, सोसायट्या आदी भागांमध्ये शिरले. त्यामुळे छोटे दुकानदार आणि रहिवासी यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काहींचे संसार वाहून गेले. दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. काही सोसायट्यांमध्ये रखवालदारांची घरे पाण्यात बुडाल्याने त्यांची अवस्था आजही बिकट आहे. या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. नुकसान झालेल्यांना नियमानुसार पाच हजार रुपये रकमेची मदत दिली जाते. पण, त्या ऐवजी नुकसानीच्या प्रमाणात मदत देण्यात यावी, अशी मागणी मोहन जोशी यांनी जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे* यांना (मंगळवारी) प्रत्यक्ष भेटून केली.
याखेरीज नदीच्या पूररेषेबाबतही त्यांनी चर्चा केली. पूररेषा लवकरात लवकर निश्चित केली जावी आणि त्याकरिता प्रशासकीय प्रक्रिया चालू करावी, असेही माजी आमदार मोहन जोशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी काँग्रेस पक्षाचे चेतन अगरवाल,सुरेश कांबळे आणि राजेंद्र परदेशी उपस्थित होते.