औंध बोपोडी, प्रभाग ८ मध्ये सर्वसाधारण खुल्या गटासाठी भाजपा अंतर्गत उमेदवारी मिळवण्याचा सामना रंगतोय

औंध : पुणे महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर औंध बोपोडी प्रभागामध्ये भाजपा पक्षाच्या सर्वसाधारण खुल्या गटासाठी भाजपा अंतर्गत उमेदवारी मिळवण्यासाठीचा सामना रंगताना पाहायला मिळत आहे.

औंध बोपोडी प्रभागामध्ये अनुसूचित जातीसाठी खुला, महिला ओबीसी, महिला खुला व सर्वसाधारण खुला असे आरक्षण पडले आहे. यामुळे प्रभागांमध्ये सर्वसाधारण खुला गटामध्ये बोपोडी परिसरातून माजी नगरसेवक बंडू उर्फ प्रकाश ढोरे व माजी नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण हे प्रबळ दावेदार रिंगणात आहेत.

माजी नगरसेवक बंडू उर्फ प्रकाश ढोरे हे मागील वेळी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आले होते. यामुळे खुल्या गटातील त्यांची उमेदवारी प्रबळ मानली जात असली तरी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान तयारीत असलेले माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान माघार घेतली आहे. यावेळी पक्षाच्या वरिष्ठांकडून त्यांना शब्द मिळाल्याची  चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने केली जात आहे. यामुळे सनी निम्हण यांची प्रबळ दावेदारी सातत्याने अधोरेखित होत आहे.

याशिवाय खासदार मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्तीय कुमार भारत केसरी विराज रानवडे यांची नुकतीच अध्यक्ष क्रीडा आघाडी भारतीय जनता पार्टी पुणे शहर पदी निवड झाली आहे. क्रीडा क्षेत्रातील प्रभावशाली नेतृत्व व औंधचा स्थानिक फ्रेश चेहरा असलेला उमेदवार म्हणून यांची देखील उमेदवारी प्रबळ मानली जात आहे.

उमेदवारी मिळवण्यासाठी उमेदवारांनी थेट मुंबई येथील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना साकडे घातले आहे. काही जणांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील आमदारांच्या माध्यमातून पक्षाकडे जोरदार तिकिटाची सेटिंग लावली आहे. तर कोथरूड मतदार संघाचा काही भाग असल्याने कॅबिनेट मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांना देखील उमेदवारीसाठी काहीजण लक्ष घालण्याची मागणी करत आहेत. औंध बोपोडी प्रभाग क्रमांक आठ च्या सर्वसाधारण खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये सध्या भाजपाच्या रिंगणामध्ये उमेदवारी कोणाच्या वाट्याला जाणार याबाबतच मोठी उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

See also  पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्र्वादीचा मेळावा; अजित पवार म्हणाले,…" कुणाचे कुणावाचून नडत नाही"