सुखी जीवनासाठी प्रेमासोबतच जोडीदारांनी एकमेकांना सहकार्य करणेदेखील महत्वाचे – लीला पूनावाला

पुण्यातील गोरान ग्रॉसकॉफ फॅमिली क्लिनिकचा  १३वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
“तरुण वयात प्रेमात पडताना शिक्षण, करिअर, आर्थिक स्वातंत्र्य या गोष्टीचा देखील महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आनंदी जीवनासाठी तरुणाईने आपल्या जोडीदारावर प्रेम करण्यासोबतच त्याला साथ देणे, सहकार्य करणे देखील अतिशय महत्त्वाचे आहे,” असे मत पूनावाला लीला पूनावाला यांनी यावेळी व्यक्त केले.


फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया अंतर्गत असलेल्या पुण्यातील प्रतिष्ठित गोरान ग्रॉसकोफ फॅमिली क्लिनिक या संस्थेचा १३ वा वर्धापन दिवस  उत्साहात पार पडला.  या निमित्त संस्थेच्या चांदणी चौक येथील वेद भवनजवळील बिरगीट्टा ग्रॉसकॉफ सभागृह येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पद्मश्री लीला पूनावाला या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर अभिनेत्री गौतमी देशपांडे यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. त्याचबरोबर संस्थेच्या अध्यक्षा फ्रेनी तारापोर, उपाध्यक्षा गीतांजली देशपांडे, प्रकल्प व्यवस्थापक अर्चना ससाणे हे देखील उपस्थित होते.


कार्यक्रमात डॉ. वैशाली देशमुख यांनी ‘ क्या यही प्यार है ‘ या विषयावर मार्गदर्शन केले. मिलिंद देशपांडे यांनी ‘भटकंती आणि व्यक्तिमत्त्वविकास’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले.  फ्रेनी तारापोर यांनी यावेळी ‘अनुभवाचे बोल’ द्वारे त्यांच्या अनुभवाचे कथन केले तर उपाध्यक्षा गीतांजली देशपांडे या संस्थेच्या वाटचालीबाबत माहिती दिली.
लीला पूनावाला म्हणाल्या,” तरुण वयात प्रेमात पडणे ही एक स्वाभाविक बाब आहे. काही वेळा त्यामध्ये यश मिळते तर काही वेळा अपयश देखील सहन करावे लागते. पण तरुण तरुणींना मी आवर्जून सांगेन की, आपल्या जोडीदाराला खंबीरपणे साथ द्या. विशेषत: मुलांनी याबाबत अधिक जबाबदार असणे आवश्यक आहे.  आपल्या जोडीदाराला तिच्या करिअरमध्ये, घरातील कामांमध्ये अथवा आयुष्यातील कोणतेही महत्त्वाचे निर्णय, घटना यामध्ये मुलांनी नेहमीच साथ दिली पाहिजे. त्याच बरोबर मुलींनीही करिअर सोबतच आपल्या कुटुंबाचीदेखील काळजी घेतली पाहिजे. परस्पर सहकार्याने आनंदी जीवन जगणे शक्य होते, ही बाब तरुणाईने लक्षात घेतली पाहिजे.”
यावेळी  ‘ध्येयपूर्तीचा प्रवास’ या विषयावर बोलताना अभिनेत्री गौतमी देशपांडे म्हणल्या,”
नवीन पिढीकडे आता पर्याय आहे, की वयाच्या कोणत्याही टप्प्यावर करिअरसाठी नवीन प्रयोग करू शकते. कोणत्याही गोष्टीसाठी कधीही वेळ निघून गेलेली नसते. वयाच्या वेगवेगळ्या टप्यावर करीअरच्या वेगळ्या वाटा निवडत पुढे वाटचाल करणारे अनेक यशस्वी उदाहरणे आज आपल्या बाजूला आहेत. त्यामुळे आपण वयाच्या मर्यादांमध्ये अडकून न राहता नवीन पर्याय नक्कीच अनुभवले पाहिजे. पण त्याचबरोबर सोशल मीडियासारखे व्यसन, इतर प्रेशर्स सांभाळून आपले मानसिक आरोग्य जपणे, हे आजच्या पिढीसमोर एक मोठे आव्हान आहे. तसेच आपल्याला असलेल्या समस्या, आपले विचार, याबाबत आताच्या पिढीने आपल्या आई वडिलांसोबत संवाद साधणे देखील आवश्यक आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना सासणे यांनी केले, तर योगिता वखारे यांनी आभार प्रदर्शन केले.


See also  दिघी बंदर ते पुणे सिमेंट रस्त्याचे काम दर्जाहीन, कारवाईची मागणी