पुणे : आप पुणे शहर कार्यकर्त्यांची अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने सुरत महापालिकेला भेट देण्यात आली.
पुणे शहरातील आम आदमी पक्षाच्या ६० पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सुरत महापालिकेचा अभ्यास दौरा ०१ नोव्हेंबर ते ०३ नोव्हेंबर या कालावधीत केला. सुरत महापालिकेत आम आदमी पक्षाचे एकूण २७ नगरसेवक असून आम आदमी पक्षाकडे महापालिकेचे विरोधी पक्षनेते पद आहे. तसेच गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला संपूर्ण राज्यभरातून ४१ लाख मते मिळवण्यात यश आले होते.
या दोन्ही गोष्टीचा विचार करता पुण्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये हे कसे शक्य झाले हे पाहण्यासाठी सुरत दौऱ्याचे आयोजन केले आहे. सदर दौऱ्याचे नियोजन हे आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी गोपाल इटालिया तसेच महाराष्ट्र राज्य संघटक अजित फटके पाटील यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली केले आहे. *सदर दौऱ्यात पुण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी, विरोधी पक्षात असतानाही सुरत महापालिकेतील आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी शाळा, दवाखाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या गोष्टींवर प्रामुख्याने कशाप्रकारे काम केले आहे याची माहिती घेतली.
या दौऱ्या विषयी बोलताना पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे म्हणाले, ” सुरत महापालिकेचा दौरा हा पुण्यातील कार्यकर्त्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरला आहे. भाजपशासित राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तसेच विधानसभेत एवढे घवघवीत यश मिळवण्यासाठी कशाप्रकारे काम केले गेले, याचा अनुभव पुण्यातील सर्व कार्यकर्त्यांना मिळाला. हा अनुभव पुण्यातही सत्तांतर करण्यास उपयोगी पडणार आहे. *आम आदमी पक्षाचा मुख्य उद्देश हा केवळ सत्तांतर नसून व्यवस्था परिवर्तन हा आहे आणि त्यासाठी अशा प्रकारे नियोजन पूर्ण अभ्यास दौरे खूप महत्त्वाचे आहेत. येणाऱ्या काळात आम आदमी पक्षाचे पुण्यातील कार्यकर्तेही नागरिकांचा आवाज बनून पुणे महानगरपालिकेत केवळ सत्तांतरच नाही तर व्यवस्था परिवर्तन ही नक्की घडवतील असा मला पूर्ण विश्वास वाटतो.