पुणे :स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कधीही जात – पात मानली नाही, त्यावर कधी विश्वास ठेवला नाही. रक्ताचे देखील तेच महत्व आहे. रक्ताला कोणतीही जात – पात नसते. आज जेव्हा समाजात जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा वेळी रक्तदान सारखे सगळ्यांना एकत्र आणणारे उपक्रम करणे अत्यंत गरजेचे आहेत. कारण रक्त दात्याने दान केलेले रक्त कोणाला जाणार हे आपल्याला माहीत नसते. अन् यातून कोणत्या समाज बांधवांचे प्राण वाचणार असेल तर यापेक्षा चांगले पुण्य नाही, असे मत निवृऱ्त्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन, पुणे आणि स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिन आणि स्वतंत्रता दिवासानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आज आयोजन करण्यात आले. ज्ञान प्रबोधिनी शाळा, उपासना मंदिर, सदाशिव पेठ येथे आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्द्घाटन निवृऱ्त्त एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कार्डीयोलॉजिस्ट डॉ. ऋतुपर्ण शिंदे, बालाजी इन्स्टिट्यूटच्या प्राचार्य डी.प्रीती जोशी, प्रसिद्ध आर्किटेक्ट पारस नेत्रगावकर, सर्जन डॉ. किरण भिसे, स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन, पुणेचे अध्यक्ष प्रीतम थोरवे, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, हिंदू रक्षक आणि गोरक्षक मिलिंदभाऊ एकबोटे, स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे सचिव मेघश्याम विश्वस्त देशपांडे, प्राची देशपांडे, वृषाली देशपांडे, भाजपच्या डॉ. निवेदिता एकबोटे, राजेंद्र काकडे, अनिल बेलकर, मनोज दादा खत्री आदी यावेळी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात 56 नागरिकांनी रक्तदान केले.
पुढे बोलताना निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले, रक्त दान म्हणजे श्रेष्ठ दान. याने एखाद्याचा जीव वाचू शकतो. क्रांती दिन व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हे कौतुकास्पद आहे. अशा रक्तदान शिबिराचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होणे गरजेचे आहे. या उपक्रमात नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून भारताला अधिक सक्षम होण्यासाठी मदत करावी, असे आवाहन देखील गोखले यांनी यावेळी केले.