पुणे : डॉ. गी प्वॉत्व्हँ स्मृती पुरस्कार पारी (पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया) आणि नमिता वाईकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. गी प्वॉत्व्हॅं अध्यासन यांच्या वतीने डॉ. गी यांच्या २० व्या स्मृतीदिनानिमित्त कोथरूडच्या गांधी भवन येथे शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या कार्यक्रमात ज्येष्ठ समाज कार्यकर्त्या व लेखिका उषाताई वाघ यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येईल.
नमिता वाईकर लेखक, अनुवादक आणि पारीच्या व्यवस्थापकीय संपादक आहेत. त्यांची शेतकरी आंदोलनावरील ‘द लाँग मार्च’ ही कादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित झाली आहे. डॉ. गी यांनी लाखाहून अधिक जात्यावरील गाणी संकलित केली. त्यातील ८२ हजार ओव्यांचे इंग्रजीमध्ये भाषांतर झालेले आहे. त्यामध्ये मोलाचे योगदान बजावल्याबद्दल हा पुरस्कार पारी व वाईकर यांना देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ हे सक्रीय लोकशाही पुढील आव्हाने व शाश्वत विकास या विषयावर व्याख्यान देणार आहेत. साईनाथ हे आशियातील सर्वात प्रतिष्ठित असलेला रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते नामांकित पत्रकार असून पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडियाचे संस्थापक संपादक आहेत.
डॉ. गी प्वॉत्व्हँ उर्फ गी बाबा
तत्वज्ञ, समाजशास्रज्ञ असलेल्या डॉ. गी प्वॉत्व्हँ यांनी १९७८ साली भारतीय नागरिकत्व घेतले. डॉ. गी यांनी पुण्याच्या दुर्गम, ग्रामीण भागात जनजागरणाचे काम सुरु केले. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणा-या विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो व त्यावर ते कशी मात करतात यावर त्यांनी अभ्यास केला. दलित आत्मकथने, संत जनाबाई, तुकारामांचे अभंग यांचे भाषांतर करण्या बरोबरच दंतकथा व लोकगीतांचे संकलन करुन त्याचा चिकित्सक अभ्यास केला. दुर्गम भागात शिक्षक टिकत नसल्याने त्याच भागातील शिक्षित युवकांच्या पुढाकारातून बिनभिंतीची शाळा सुरु केली. यातील २६ शिक्षकांना नंतर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून मान्यता मिळाली. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसाठी स्वयंशिक्षण कार्यशाळा सुरु केली. जनजागरण हे पुस्तक लिहिले. यातून गरीब डोंगरी संघटना, जन हित विकास चळवळ सारख्या संघटना उभ्या राहील्या. आरोग्य रक्षक, स्री शक्ती मंडळे, सुईणी, पशुसंवर्धन, पंचायत राज या माध्यमातून सक्रिय नागरिक बनवून लोकांना त्यांच्या हक्काबद्ल जागृत केले. लोकशाही प्रक्रियेतून शाश्वत विकास करता येतो यावर त्यांचा दृढ विश्वास होता.
त्यांनी व्हिलेज कम्युनिटी डेव्हलपमेंट असोसिएशन, समाजशास्रीय सहकारी संशोधन केंद्र सुरु केले. समाजशास्रीय सहकारी संशोधन पध्दतीतून वंचित समुहातील युवकांना त्यांच्या जातीजमातींचा चिकित्सक अभ्यास करायला लावून पुस्तके लिहिण्यास प्रवृत्त केले.