राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदी महेश शिंदे यांची निवड

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे यांची निवड झाली आहे. ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी शिंदे यांच्या निवडीचे पत्र दिले. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून शिंदे गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. त्यांच्यातील वक्तृत्व, विषयाची मांडणी करण्याची शैली, अभ्यासू वृत्ती लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर पक्षाची अधिकृत भूमिका व विचार मांडण्यासाठी प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे.

शिंदे यांनी गेली ४०-४५ वर्षे आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून भरीव काम केले आहे. या कामाच्या अनुभवाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून राज्यभर व्यापक काम करताना त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिंदे यांचा अनुभव येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चेबांधणीत महत्वाचा ठरणार आहे.

पक्षाने प्रदेश कमिटीवर उपाध्यक्षानंतर आता प्रदेश प्रवक्तेपदी काम करण्याची संधी दिल्याचा आनंद आहे. यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानतो. येत्या काळात पक्षाची भूमिका व विचार अधिक सक्षमपणे व अभ्यासूपणे मांडण्यावर माझा भर असणार आहे, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

See also  कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील सेवकांसाठी तणावमुक्त जीवन जगण्याची कार्यशाळा