नवरात्रौत्सवात चतुःश्रृंगी मंदिर२४ तास खुले

पुणे – शारदीय नवरात्रौत्सवात चतुःश्रृंगी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले ठेवले जाईल, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अमित अनगळ आणि कार्यकारी विश्वस्त श्रीकांत अनगळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

यंदा नवरात्रौत्सव दिनांक ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला दिनांक ३ रोजी सकाळी ९ वाजता घटस्थापना होईल. मंदिराचे व्यवस्थापक विश्वस्त देवेंद्र देवदत्त अनगळ यांच्या हस्ते घटस्थापना होईल. त्यानंतर नवचंडी होम होईल. पौरोहित्य श्रीराम नारायण कानडे गुरूजी करणार आहेत.

मंदिरात उत्सव काळात दररोज अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात येईल. श्रीसूक्त, ललितासहस्त्रनाम, महिषासुरमर्दिनी स्तोत्र आणि वेदपठण, असे धार्मिक कार्यक्रम दररोज होतील. तसेच दररोज सकाळी १० वाजता आणि रात्री ९ वाजता महाआरती होईल. त्या दोन्ही वेळेस १० लोकांतर्फे शंखनाद करण्यात येईल.

विजयादशमीला शनिवार दिनांक १२ रोजी सकाळी साडेआठ वाजता नवचंडी होम होईल. या दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून देवीच्या सीमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून निघेल. बॅंड, ढोल-लेझिम पथक, नगारा, चौघडा अशी वाद्य असतील आणि देवीचे भुत्ये, वाघ्या मुरळी यांच्यासह देवीचे सेवेकरी पालखीच्या मिरवणुकीत सहभागी होतील. मराठी सिनेसृष्टीतील कलावंतांचे पथकही मिरवणुकीत सहभागी होईल, ते यंदाचे आकर्षक असेल. पालखीत २५ जणांचे शंखनाद पथक राहील.  हेलिकॉप्टरमधून पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येईल.

टेकडीवरील गणपती मंदिरात उत्सव काळात दररोज भजन, कीर्तन, प्रवचन होईल. सुयोग मित्रमंडळाच्या वतीने निवारा वृद्धाश्रमातील आजींसाठी भोंडल्याचा कार्यक्रम मंदिर परिसरात होणार आहे.

नवरात्रौत्सवात एक भाविक देवीला सोने आणि मोत्याची नथ अर्पण करणार आहेत. ३लाख रुपये किमतीची ही नथ आहे.

आपत्ती व्यवस्थापन सहाय्यासाठी दीडशे स्वयंसेवक कार्यरत रहाणारं आहेत. युवराज तेली मेमोरियल ट्रस्ट तर्फे कॉर्डिॲक ॲम्ब्युलन्स उपलब्ध केली जाणार आहे. तसेच २४ तास दोन डॉक्टर्स आणि सपोर्ट स्टाफ असे ८ जणांचे पथक उत्सवात अहोरात्र सेवेत राहील.

पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था विनामूल्य करण्यात येणार असल्याची माहिती अमित अनगळ यांनी सांगितली.

See also  नैसर्गिक नसून पुणे मनपाने तयार केलेल्या खड्यांच्या विरोधात मनसेचे आंदोलन