शेतकरी आठवडे बाजार की ,कार्यकर्त्यांना ” पॉकेट मनी “साठी राजकीय नेत्यांकडून करून दिलेली सोय

बाणेर : पुणे शहर परिसरात सध्या शेतकरी आठवडे बाजारचे पेव मोठ्या प्रमाणात पसरलेले दिसून येत आहे औंध परिसरामध्ये अंदाजे सात ते आठ जागेवर तर बाणेर, बालेवाडी परिसरामध्ये अंदाजे दहा ठिकाणी आठवडे बाजार भरविले जात आहेत परंतु रस्त्यावरच हे आठवडे बाजार भरविले जात असल्यामुळे तसेच आठवड्यातल्या प्रत्येक वारी परिसरामध्ये कोठे ना कुठेतरी हे आठवडे बाजार असतातच असे निदर्शनास येत आहे. राजकीय नेत्याने आपल्या लेटरहेडवर लिहून दिल्यास कोणत्याही ठिकाणी आठवडे बाजार भरवण्यास परवानगी मिळते असे चित्र सध्या राजकीय आशीर्वादाने सुरू असलेल्या आठवडे बाजारामुळे निर्माण झालेले दिसते. वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व आठवडे बाजार भरविले जात असलेल्या ठिकाणी राजकीय नेते व कार्यकर्त्यांचे फोटो मात्र मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

या शेतकरी आठवडे बाजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता याची माहिती घेतली असता असे दिसून येत आहे की 90% आठवडे बाजार हे आर्थिक गणितांवर अवलंबून असलेले दिसून येत आहे. आठवडे बाजार आयोजक तसेच राजकीय कार्यकर्ते यांच्यामधील आर्थिक देवाणघेवाणीनेच या आठवडे बाजारांचे प्रमाण वाढले असल्याचे लक्षात येत आहे. परंतु या नकली शेतकऱ्यांच्या आठवडे बाजारांमुळे प्रामाणिकपणे आठवडे बाजार भरवणाऱ्या खऱ्या शेतकऱ्यांचे मात्र नुकसानच होत आहे.

आठवडे बाजार भरवण्यामागचे आर्थिक गणिते पाहिले असल्यास असे आढळून येते की प्रत्येक आठवडे बाजारामध्ये अंदाजे 50 गाळे असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी गाळेधारकाकडून प्रत्येक दिवशी पाचशे रुपये घेतले जातात तर काही ठिकाणी हाच आकडा 1000 रुपये प्रत्येक दिवशी असा दिसून येतो. अंदाजे एका दिवसाच्या आठवडे बाजारामध्ये आयोजकास दहा ते पंधरा हजाराचा फायदा होतो तर राजकीय कार्यकर्त्यास पंधरा ते वीस हजारापर्यंत पॉकेट मनी मिळतो. हाच आकडा काही मोठ्या आठवडे बाजारांमध्ये दर महिना अडीच लाखापर्यंत झालेला दिसून येतो त्यामध्ये राजकीय कार्यकर्त्यांना 80 हजार रुपयापर्यंत पॉकेट मध्ये मिळत असल्याचे दिसून येते.अशा आठवडे बाजारामध्ये नागरिकांना देखील या आठवडे बाजार मध्ये चढ्या दराने भाज्या खरेदी कराव्या लागतात.

See also  स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील विधानभवन येथे केलेली आकर्षक विद्युत रोषणाई

रस्त्यांवर बेशिस्तपणे पादचारी मार्ग अडवून थाटात आठवडे बाजार मांडले जातात व याचे भाडे देखील अनधिकृत रित्या वसूल केले जात असल्याचे नागरिक सांगतात. भर रस्त्यात भरविण्यात येत असलेल्या आठवडे बाजारांमुळे विविध ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा नागरिक याची तक्रार महानगरपालिकेकडे तसेच पोलीस वाहतूक विभागाकडे करत आहेत परंतु या आठवडे बाजारांवर कोणत्याही प्रकारचे ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या आठवडे बाजारांमधून अधिकाऱ्यांना देखील अर्थपुर्ण सहकार्य मिळत असल्याची चर्चा परिसरातील नागरिक करत आहेत.