संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज संघटनेला ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता; पक्षचिन्हही मिळालं

पुणे : संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पाश्वभूमीवर त्यांनी तयारीदेखील सुरु केली आहे. अशातच आता त्यांच्या संघटनेला निवडणूक आयोगाने ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता दिली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.

संभाजी राजे छत्रपती  म्हणाले, “९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल”, असं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं. याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून संदेशही दिला. “मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवली आहे. आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्हदेखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल”, असे ते म्हणाले.

दरम्यान, संभाजराजे छत्रपती यांनी २०२२ मध्ये स्वराज्य संघटनेची स्थापना केली होती. स्वतंत्र पक्ष स्थापन करावा असं अनेकांनी सुचवलं त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं. “तुम्ही वेगळा पक्ष स्थापन करायला हवा असं अनेकांनी सांगितलं. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. सोशल मीडियाची, शिवभक्तांची काय ताकद आहे हे गेल्या काही दिवसांत समजलं. या ५-६ दिवसांत अनेकांनी मला शक्य त्या सर्व माध्यमातून सांगितलं की संभाजीराजे, तुम्ही स्वतंत्र पक्ष काढा. मी त्यांचा आदर आणि आभार व्यक्त करतो. हीच भावना आमच्याबद्दल राहू द्यावी”, असं ते म्हणाले होते.

See also  महाराष्ट्र असिमीत ताकदीचे राज्य, पण थांबू नका! फ्लॅगशिप योजनांसाठी स्वतंत्र वॉररूम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, सरकारच्या आगामी काळातील वाटचालीची दिशा केली स्पष्ट