राजकीय साठमारीत उपनगर हडपसर बनले समस्यांचे आगार
वाहतूककोंडी, पाणीपुरवठा, अतिक्रमण, गुन्हेगारी मुद्दे निवडणुकीत गाजणार

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील आघाडीचे उपनगर व आयटीएन्स आणि टाऊनशिपचे शहर म्हणून ओळखले जाणारे हडपसर, सध्या मूलभूत समस्यांच्या गर्दीत अडकलेले आहे, जीवघेणी वाहतूक कोंडी पर्याय रस्त्यांचा अभाव, उदासीन लोकप्रतिनिधी अकार्यक्षम प्रशासन यामुळे हडपसर परिसर बकाल बनत चालले आहे, आगामी निवडणुकीत मूलभूत समस्या प्रमुख मुद्दे असणार आहेत.

हडपसर विधानसभा मतदारसंघात समाजवादी विचारसरणीचे स्व.रामभाऊ तुपे, स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील, काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, अखंड शिवसेनेचे स्वर्गीय सूर्यकांत लोणकर, महादेव बाबर, भारतीय जनता पार्टीचे योगेश टिळेकर व सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे चेतन तुपे यांनी आमदार म्हणून नेतृत्व केले आहे.

पुणे महापालिकेतील शेवटचा भाग समजला जाणारा हडपसर शेतीप्रधान, ग्रामीण व कोसमोपॉलिटीन समजला जातो, मगरपट्टा सिटी अमनोरा टाऊनशिपसारखे दोन मोठे प्रकल्प, जगात नावजलेली सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र याच हडपसर मध्ये आहे. आयटी क्षेत्रात नावाजलेले हडपसर येथे लाखो नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध झाल्या, परंतु राज्य शासनात, महापालिकेत विविध जबाबदाऱ्या मिळूनही लोकप्रतिनिधींना भरीव कामगिरी करता न आल्याने पुण्याच्या पश्चिम भागाच्या मानाने पूर्व भागातील हडपसर बकाल झालेले दिसत आहे.


वाहतुकीची प्रचंड कोंडी, अनियमित पिण्याचा पाणीपुरवठा, रखडलेले पथारी पुनर्वसन, सक्षम नसलेले पर्यायी रस्ते, गुन्हेगारी, बोकाळलेले अवैध धंदे, पालिकेने लादलेले कचरा प्रकल्प, चुकीचे उड्डाणपुल, बिघडलेली वाहतूक व्यवस्था असे एक ना अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत, सत्ता मिळूनही लोकप्रतिनिधींना दूरदृष्टीने मोठे प्रकल्प उभारता आलेले नाहीत, पुण्यातील सर्वात मोठा लोकसंख्येच्या मानाने मतदार संख्या असलेल्या हडपसर मध्ये शासनाचे किंवा महापालिकेचे वैद्यकीय हॉस्पिटल नाही, मगरपट्टा येथील स्वर्गीय अण्णासाहेब मगर रुग्णालयाची दुरावस्था आहे, लोकसंख्येच्या मानाने गार्डन उपलब्ध नाहीत मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही, पादचाऱ्यांना चालण्यासाठी पादचारी पथ नाहीत, वाहन चालकांसाठी प्रशस्त वाहनतळ नाही, चुकीच्या पद्धतीने होत असलेली बांधकामे, अपुरे रस्ते यामुळे येथील नागरिकांना दैनंदिन जीवनात कसरत करावी लागत आहे, निवडणुका आल्या की उमेदवार मोठमोठी आश्वासने देतात, वचननामे जाहीर करतात परंतु प्रत्यक्षात त्यातील कोणतेच प्रकल्प साकारले जात नाहीत त्यामुळे राजकारण्यांविषयी नागरिकांच्या मनात प्रचंड रोष आहे आगामी निवडणुकीत हडपसर मधील रखडलेले मूलभूत प्रश्न कळीचा मुद्दा ठरणार असून, येथून दुसऱ्यांदा आमदार निवडून येत नाही हा हडपसर चा पायंडा कायम राहणार का? रखडलेले हडपसर चे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा नव्या उमेदवारास संधी दिली जाणार का? नागरी प्रश्नांमुळे हैरान जनता मतदान पेटीतून आपला राग व्यक्त करणार का? याची उत्तरे आगामी काळात दिसून येतील. मूलभूत प्रश्नांभोवती व रखडलेल्या विकासकामांवर निवडणूक झाली तर परिवर्तन अटळ असल्याचे राजकीय जाणकार बोलत आहेत.

See also  बालेवाडी लक्ष्मी माता चौक येथे रस्त्यावरील खड्ड्यात टँकरचे चाक अडकल्याने वाहतूक कोंडी