सेमी कंडक्टर उत्पादन क्षेत्रात आघाडी घेण्याची महाराष्ट्राची क्षमता व्हीएलएसआय सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सत्य गुप्ता यांचे प्रतिपादन

पुणे: संगणकापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्व तंत्रज्ञानांमध्ये अनिवार्य असलेल्या सेमीकंडक्टर उत्पादनामध्ये देशात आघाडी घेण्याची क्षमता महाराष्ट्राकडे असून त्यादृष्टीने सर्व पातळ्यांवर तयारी सुरू असल्याची माहिती व्हेरी लार्ज स्किल इंटिग्रेटेड सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सत्या गुप्ता यांनी आज दिली.

सेमीकण्डक्टर उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करणाऱ्या व्हीएलएसआय सोसायटीची ‘३९ वी व्हीएलएसआय डिझाइन आंतरराष्ट्रीय परिषद २०२६’ आणि ‘२५ वी आंतरराष्ट्रीय एम्बेडेड सिस्टम्स परिषद’ पुण्यात भरवण्यात आली आहे. या परिषदेला देशभरातून अडीच हजाराहून अधिक प्रतिनिधी उपस्थित असून तब्बल साडेपाचशे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले आहेत. परिषदेच्या उद्घाटन सत्रानंतर डॉ. गुप्ता यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी शैलेश परब,  रणजित येवले  आणि संजय घोरपडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सध्याच्या काळात सर्व क्षेत्रात उपयोगात आणल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये सेमीकंडक्टर हा घटक अनिवार्य आहे. महाराष्ट्रात सेमी कंडक्टर उत्पादन क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा व अन्य सर्व आवश्यक घटक उपलब्ध आहेत. या क्षेत्राला गती देण्यासाठी उद्योग, शिक्षण संस्था आणि शासन यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असून त्या दृष्टीने सोसायटीने पुढाकार घेतल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

केंद्र सरकारबरोबरच आसाम, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांचे सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्राशी संबंधित धोरण निश्चित झाले आहे. महाराष्ट्रात हे धोरण निश्चित करण्याचे काम सुरू असून सरकारकडून याबाबत अनुकूल प्रतिसाद लाभत आहे. महाराष्ट्रात या क्षेत्रासाठी सर्वाधिक अनुकूलता असल्याचे गुप्ता यांनी नमूद केले.

सेमी कंडक्टर उत्पादनक्षेत्रात आयटीआय प्रशिक्षित तंत्रज्ञापासून पदविका आणि पदवीधारक अभियंत्यांपर्यंत सर्वांना रोजगाराच्या संधी आहेत. सेमी कंडक्टर डिझाईन आणि प्रत्यक्ष उत्पादन यासाठी सध्या अनेक शिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र, अद्याप या नव्याने उदयाला येत असलेल्या क्षेत्राबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये पुरेशा प्रमाणात माहिती झालेली नाही. या क्षेत्रात सॉफ्टवेअर क्षेत्रापेक्षाही अधिक आकर्षक संधी उपलब्ध असल्याबद्दलची जाणीव शालेय स्तरापासूनच विद्यार्थी आणि पालकांना करून देणे आवश्यक असून त्यासाठी विविध शिक्षण संस्थांच्या सहकार्याने व्हीएलएसआय सोसायटी प्रयत्नशील असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.

See also  शरिराला आवश्यक चांगल्या जीवनसत्त्वासाठी मुलांनी नाचणीचे पदार्थ खावेत!ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

सेमी कंडक्टर उत्पादन क्षेत्रात विद्यार्थी घडवण्यासाठी सोसायटीने प्राधान्य दिले असून आगामी पाच वर्षात 50 हजार प्रशिक्षित मनुष्यबळ घडवण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्वतः सेमीकंडक्टर बनविण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्थांना संस्थेच्या वतीने अनुदानही देण्यात येणार आहे, असेही गुप्ता यांनी सांगितले.

दरम्यान, या परिषदेत विविध कंपन्या, संस्था सहभागी झाल्या असून अनेक परिसंवाद यामध्ये होणार आहेत, ही परिषद 7 जानेवारी पर्यंत चालणार आहे.