पुणे : “आपल्या दृष्टीपलीकडे नेमके काय आहे, याचे कुतूहल शमविण्यासाठी सातत्यपूर्ण संशोधन होत आहे. अनेक ग्रह-ताऱ्यांचा उलगडा करण्यासाठी भारतासह जगभरातील शास्त्रज्ञ अनेक संशोधन मोहीम राबवत आहेत. विश्वाच्या उत्पत्तीचा, सूर्यमालेचा, पृथ्वीचा, आकाशगंगेचा वेध घेण्यासाठी बिग बँग थिअरीसारखे प्रयोग झाले. ‘डार्क मॅटर’ आकाशगंगेच्या निर्मितीमध्ये महत्वपूर्ण घटक असून, त्यावरील अभ्यासातून रहस्यमय उलगडा आगामी काळात होईल,” असे मत अमेरिकेतील ड्यूक युनिव्हर्सिटीचे प्रतिथयश प्रोफेसर डॉ. आशुतोष कोतवाल यांनी व्यक्त केले. कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने ‘डार्क मॅटर’ वरील संशोधन अधिक प्रभावी होईल, असेही त्यांनी नमूद केले.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र आणि ग्लोबल इंडियन सायंटिस्ट अँड टेक्नोक्रॅट्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आशुतोष कोतवाल यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. ‘सर्चिंग फॉर डार्क मॅटर ऍट लार्ज हॅड्रॉन कोलिडर विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन अ सिलिकॉन चिप’ या विषयावर डॉ. कोतवाल यांनी विद्यार्थी व विज्ञानप्रेमींशी संवाद साधला. प्रसंगी सीओईपीचे अधिष्ठाता डॉ. डी. एन. सोनवणे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या डॉ. विभा व्यास, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे डॉ. अनिल हिवाळे, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीच्या डॉ. शिल्पा मेटकर, विज्ञान भारतीचे क. कृ. क्षीरसागर, प्रा. आर. व्ही. कुलकर्णी, डॉ. कौस्तुभ साखरे, प्रा. सुनील कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
विश्वनिर्मितीच्या रहस्यांचा उलगडा करताना सूक्ष्म मूलकण ‘हिग्ज बोसॉन’चा शोध आणि त्याच्या गुणधर्माचा व वस्तुमानाचा अचूक अंदाज बांधत डॉ. कोतवाल यांनी मार्गदर्शन केले. अफाट ब्रह्मांड, सूर्य-तारे, आकाशगंगा, ग्रहमाला, निर्वात पोकळी, अवकाश, कृष्णविवरे, उल्का, डार्कमॅटर, त्यांचे वस्तुमान, गुरुत्वाकर्षण अशा विविध अंगानी कोतवाल याची विद्यार्थ्यांसमोर सहज व सोप्या पद्धतीने माहिती दिली. प्रत्येक गोष्टीचा चिकित्सक अभ्यास करताना स्वतःच्या डोळ्याने त्या गोष्टीची अनुभूती घेण्याची जिद्द आपल्या अंगी असायला हवी, असा सल्लाही कोतवाल यांनी दिला.
प्रा. अश्विनी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कौस्तुभ साखरे यांनी आभार मानले.
घर साहित्य/शैक्षणिक आकाशगंगेच्या निर्मितीत ‘डार्क मॅटर’ महत्वपूर्ण प्रोफेसर डॉ. आशुतोष कोतवाल यांचे मत; विज्ञानभारतीतर्फे...