कोथरूड : कोथरूड मतदारसंघातील महायुतीचे बंडखोर,
अपक्ष उमेदवार विजय डाकले यांना कोथरूडमधील
सर्वसामान्य वर्गातून वाढता पाठिंबा मिळत असून त्यांच्या
प्रचारफेऱ्या, कोपरासभा व बैठकांना नागरिकांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळत आहे.
मागील दोन दिवसांमध्ये विजय डाकले यांनी बाणेर, बालेवाडी, पाषाण, कोथरूड मधील किष्किंधानगर, जय भवानीनगर, केळेवाडी परिसरात कोपरासभा, बैठका, प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला. एक सर्वसमावेशक, सर्वसामान्य उमेदवार म्हणून पाठिंबा देण्यासाठी वस्ती विभागातील ठिकठिकाणी त्यांना बैठकांना बोलावले जात असून पाठिंबा दर्शवला जात आहे. बहुजन तसेच हिंदू संघटनांचाही त्यांना पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.
यावेळी विजय डाकले म्हणाले, मागील दहा वर्षात कोथरूडचा विकास खुंटला आहे. री डेव्हलपमेंटच्या माध्यमातून नवी टोलेजंग बांधकामे होत असताना, लोकसंख्या वाढत असताना मूलभूत सुविधांवर येणारा ताण सोडवण्याकडे प्रशासन व राज्यकर्त्यांकडे होणारे दुर्लक्ष कोथरुडला समस्यांच्या गर्तेत घेऊन जात आहे. या समस्यांवर लक्ष देण्याऐवजी येथील राज्यकर्ते वाटप, यात्रा, जत्रा यातच अडकलेले आहेत, त्यांना कोणताही नवीन प्रोजेक्ट कोथरूडसाठी आणता आला नाही ही खेदाची गोष्ट आहे. वरून चमकणारे कोथरूड आतून पोखरले जात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी येथील मतदारांना नवा पर्याय हवा आहे. स्थानिक भूमिपुत्र असून येथील सर्व स्तरातील नागरिकांचे प्रश्न मला माहित असल्याने आणि ते सोडवण्याची धमक माझ्यात असल्याने माझा समाज, मतदार माझ्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास विजय डाकले यांनी व्यक्त केला. यावेळी नागरिक, महिला, युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.