खडकवासला : सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राचा तमाशा करून ठेवला आहे. कोणी खोक्यात विकला जातोय तर कोणी कुठल्याही पक्षात जातोय. तुमच्या मताला काही किंमत नाही. मतदारांनी एका पक्षातील माणसाला मतदान करायचं निवडून आल्यावर त्या माणसाने उठून दुसऱ्या पक्षात जायचं. तो पक्ष नको म्हणून तुला मतदान केलं आणि तू त्या पक्षात जाऊन बसला. हा सगळा खेळ सुरू आहे. या पाच वर्षांपासून कोण कुठे जातोय, कोण कोणा बरोबर चाललंय काही माहित नाही. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची आयपीएल झाली आहे. कोण कोणत्या संघात खेळतोय हेच कळत नाही. कोणत्या संघाबद्दल टाळ्या वाजवायचे हे पण कळत नाही. हा तुमच्या मतांचा अपमान गेल्या पाच वर्षांमध्ये झाला आहे. त्याचा बदला घ्यायची वेळ आली आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मयुरेश वांजळे यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
राजकीय परिस्थितीचा आढावा घेत राज ठाकरे म्हणाले,
मूलभूत गरजांकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून या सगळ्या राजकारण्यांनी तुम्हाला जातीजातीमध्ये विभागून टाकले. हा या जातीचा तो त्या जातीचा. जातींबरोबर आमच्या महापुरुषांनाही जातीपातीत विभागले आहे. ही राजकारण्यांनी मते मिळविण्यासाठी केलेले सोंग आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले की आता महाराष्ट्राच्या विकासासाठी दूरदृष्टीची गरज आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करून राज ठाकरे म्हणाले की, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जन्माला आल्यानंतर जाती जातींमध्ये द्वेष निर्माण केला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जातीपातीचे राजकारण सुरू झाले. शरद पवारांनी त्यांच्या बारामती तालुक्यामध्ये इंडस्ट्री आणली ती महाराष्ट्रात का नाही आणली असा सवाल करत राज ठाकरे म्हणाले ते जाणता राजा किंवा लोकनेते नाहीत तर ते फक्त तालुक्याचे नेते आहेत.
जातीयवादातून भांडायला सुरुवात झाली की मूळ विषयाकडे लक्ष कोण देणार आमदार खासदारांना हेच हवे आहे तुम्ही या जातीपातीच्या राजकारणात गुंतून रहा आम्ही टेंडर काढतो रस्ता बनवतो परत सहा महिन्यात रस्त्याला खड्डे पडतीले की परत पुन्हा टेंडर काढून त्यातून आम्ही आमचे टक्के घेऊ. तुम्ही जातीपातीमध्ये भांडत रहा असे सांगून ते म्हणाले आपण
आपण विकास केला की सत्यनाश याचा शोध घेतला पाहिजे. राज्यासाठी एक दूरदृष्टी घेऊन आम्ही विकास करणार असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला मतदान करून निवडून द्यावे अशी आवाहन राज ठाकरे यांनी मतदारांना केले.
सभेस खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विजय मते, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मते, शुक्राचार्य वांजळे, हर्षदा वांजळे, माजी नगरसेविका सायली वांजळे शिंदे, मारूती टिंगरे, निलेश जोरी, रमेश गोरे,
सरचिटणीस गणेश सातपुते, शिवाजी मते, शहर संघटक चंद्रकांत गोगावले यांच्यासह खडकवासला मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते
…रमेश असता तर माझ्या बरोबर असता.
रमेश वांजळे यांच्या आठवणीने राज ठाकरे झाले भावुक.
मला तो दिवस अजूनही आठवतोय. आमचा रमेश शेवटचं जर कोणाशी बोलला असेल तर तो माझ्याशी बोलला. मी त्याला फोन लावला. त्याने मला सांगितलं मी हॉस्पिटलला आलो आहे. एमआरआय काढायला. दहा मिनिटात माझा एमआरआय झाला की मी लगेच तुम्हाला फोन करतो. मी म्हटलं झाल्या झाल्या मला फोन कर महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि पंधरा-वीस मिनिटांनी फोन आला की आमचा रमेश गेला. म्हणजे मी म्हटलं माझ्याशी आत्ता तर बोलला. तो एमआरआय काढताना गेला. पुढे काय बोलायचं समजेना. बाकीचे अनेक जण मला सोडून गेले पण आज रमेश असता तर माझ्याबरोबर असता. अनेकदा मी सांगायचो गळ्यातली वजन काढ. (रमेश वांजळे यांच्या गळ्यात कायम तीन ते चार किलो सोन्याचे दागिने असायचे) त्यानंतर माझ्यासमोर कधी घालायचा नाही. आज मला मयुरेश पुन्हा रमेश ची आठवण करून देत आहे. असा मयुरेश सोन्याने मडलेला गोड पोरगा आहे. असे कौतुक त्यांनी मयुरेशचे केले