खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मतमोजणी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न

पुणे :खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मतमोजणी प्रशिक्षण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कोरेगाव पार्क येथे यशस्वीरित्या पार पडले. मतमोजणी प्रक्रियेत अचूकता आणि पारदर्शकता राखण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाने झाली. डॉ. माने यांनी मतमोजणी प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता आणि कायदेशीर बाबींचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत मार्गदर्शन केले आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले.


सहा. निवडणूक निर्णय अधिकारी किरण सुरवसे यांनी मतमोजणी प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल) यंत्रणांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी मतमोजणीसाठी आवश्यक असलेल्या नियामक बाबी आणि प्रक्रियेचे सादरीकरण केले.इव्हीएम कक्षाचे नोडल अधिकारी सचिन आखाडे आणि नारायण पवार यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणांच्या कार्यप्रणालीबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मशीन हाताळणीतील अचूकतेचे महत्त्व समजावून सांगितले.यावेळी अंकुश गुरव, वाहतूक नियोजन कक्षाचे बालाप्पा धनशेट्टी, मनुष्यबळ कक्षाचे प्रमोद भांड, धम्मदीप सातकर, साहिद सय्यद, आणि भूमेश मसराम उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून मतमोजणी प्रक्रियेत अचूकता कशी राखावी, यावर चर्चा केली.


प्रशिक्षणादरम्यान, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि अचूक निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक तांत्रिक व व्यावहारिक बाबी शिकल्या. मतमोजणी प्रक्रियेत येणाऱ्या त्रुटी टाळण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समाप्तीला डॉ. माने यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेतील जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रशिक्षणामुळे खडकवासला मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि सुसूत्र होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

See also  ओबीसी विभागात तीन नवी महामंडळे