पुणे मनपाच्या डॉ. वैशाली जाधव यांना यंदाचा ‘सावित्री’ पुरस्कार जाहीर

पुणे : ‘सावित्री फोरम’तर्फे पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्यअधिकारी डॉ. वैशाली जाधव यांना स्त्री भ्रूण हत्या विरोधी कार्य केल्याबद्दल ‘सावित्री’ पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याबरोबरच ७५ विद्यार्थिनींना एकूण सुमारे 1 लाख रुपयांची शैक्षणिक मदतही देण्यात येणार आहे. ज्येष्ठ लेखिका सौ. वर्षा गजेंद्रगडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार दि. २८ जुलै रोजी सायं 5 वाजता जवाहरलाल नेहरु ऑडिटोरियम, घोले रोड, पुणे येथे संपन्न होईल अशी माहिती सावित्री फोरमच्या सचिव संयोगिता कुदळे यांनी दिली.

त्या म्हणाल्या की, सन २०१५मध्ये ही संस्था नोंदणीकृत ट्रस्ट म्हणून स्थापन केली. तेव्हापासून दरवर्षी ७५ मुलींना सुमारे 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सावित्री हा पुरस्कार यावर्षी पासून सुरु करण्यात आला आहे. सावित्री फोरमतर्फे महिलांच्या उन्नतीसाठी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी सातत्याने केले जाते. आरोग्य शिबिरे, महिला उद्योजकांसाठी प्रदर्शन, सॅनिटरी पॅडचे वाटप, रक्तदान शिबिर, कपडे गोळा करून गडचिरोलीला पाठवणे, अनाथाश्रम व वृद्धाश्रमात खाऊ वाटप व करमणूकीचे कार्यक्रम, महिलाश्रम येथे कपडे, चादरी वाटप, दंत चिकित्सा शिबिर, मेकअप वर्कशॉप, सायबर क्राईम अवेयरनेस, आहार व आरोग्य, मॉकटेल सरबते बनवणे, राखी, आकाशकंदील, पॉट गार्डन बनवणे, व्याख्याने, फॅशन शो, रंगारंग कार्यक्रम, वार्षिक सहल असे अनेक उपक्रम सावित्री फोरमतर्फे दरवर्षी आयोजित केले जातात असे सचिव संयोगिता कुदळे यांनी सांगितले.

See also  हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र व्हावे- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार