पुणे : संपर्क संस्था बालग्राम च्या माध्यमातून अनाथ मुला मुलींचा सांभाळ करणे, त्यांचे शिक्षण पूर्ण करणे व पुढे लग्न ही लावून देणे हे कार्य कौतुकास्पद असून मी ह्या संस्थेच्या पुणे जिल्ह्यातील सहा व राज्यातील बारा शाखांना सर्वतोपरी मदत करेन असे वचन आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. आज आमदार झाल्यानंतर मुंबई येथून पुण्याकडे येताना मळवली येथे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने संपर्क बालग्राम संस्थेस उपयोगी साहित्य भेट देण्याचा तसेच विद्यार्थ्यांतर्फे चंद्रकांतदादांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,फाउंडेशन च्या विश्वस्त व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,विश्वस्त सतीश कोंडाळकर, बालग्राम चे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, सामाजिक कार्यकर्ते सचिन निंबाळकर, चेतन जोशी, संस्थेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
चंद्रकांतदादा पाटील प्रचंड मताधिक्याने निवडून आल्यावर त्यांना काय भेट द्यावी याचा विचार करत होतो – मग त्यांनी ज्या पद्धतीने तळागाळातील नागरिकांना काय हवं नको याकडे लक्ष दिले व त्यांना ते पुरविण्याचा ध्यास घेतला – त्याच धर्तीवर विविध सामाजिक संस्थांना मदत करावी असे ठरविले आणि त्यास अनुसरून आज मळवली येथील संपर्क बालग्राम मधील 130 विद्यार्थ्यांसाठी दादांच्या हस्ते सोलापूरी चादरी तसेच स्पीकर सेट भेट देण्याचा उपक्रम पार पडला असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर हे चांगलं काम करणाऱ्या योग्य संस्थेची निवड करतात आणि त्यांना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते पुरवितात असे आवर्जून नमूद करतानाच मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले “बालग्राम संस्था खूप चांगलं काम करत असून एवढ्या अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे महत्वपूर्ण काम करत आहेत, त्यामुळेच मी देखील शासनाच्या स्तरावर आणि वैयक्तिक सी एस आर निधीतून संस्थेसाठी काय करता येईल याची यादी करून त्यासाठी प्रयत्न करेन” असेही चंद्रकांतदादांनी स्पष्ट केले.
संस्थेच्या वतीने आ.चंद्रकांतदादा पाटील, संदीप खर्डेकर, मंजुश्री खर्डेकर यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला.संस्थेतील विद्यार्थिनींनी सलामी देऊन मान्यवरांना अभिवादन केले.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर अमितकुमार बॅनर्जी यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाचे संयोजन क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर यांनी केले.