विकास आराखडा रखडल्याने ३४ गावात बकालीकरण; हवेली कृती समितीचा आंदोलनांचा निर्धार

पुणे: विकास आराखडा रखडल्याने पुणे महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या ३४ गावांचे वीज, कचरा,पाणी, रस्ते ,ड्रेनेज अशा मुलभूत सुविधां अभावी बकालीकरण झाले आहे.दुसरीकडे पालीका भरमसाठ कर गोळा करत आहेत. विकास आराखडा तातडीने मंजूर करुन पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर शहराच्या सभोवतालच्या ३४ गावांतील विकास कामे राबविण्यात यावी अन्यथा जन आक्रोश आंदोलन सत्याग्रह करण्याचा निर्धार सर्व पक्षीय हवेली तालुका नागरि कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी दिला आहे.


धायरी येथे झालेल्या कृती समितीच्या बैठकीत
कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांच्यासह समीतीचे उपाध्यक्ष पोपटराव खेडेकर, संतोष ताठे, बाळासाहेब हगवणे, संदीप कोंढरे, सुभाष नाणेकर,धायरीचे माजी सरपंच गुलाबराव पोकळे, सनी बांदल, धनंजय पोकळे, चंद्रकांत वांजळे, नामदेव भुरुक,सागर जाधव , संदीप पोकळे, संदीप चव्हाण, मिलिंद पोकळे आदी उपस्थित होते.


श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले, कृती समितीने ३४ गावांच्या समावेशासाठी न्यायालयात यशस्वी लढा दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार दोन टप्प्यांत ३४ गावांचा समावेश करण्यात आला मात्र विकास आराखडा नसल्याने कामांचे योग्य नियोजन नाही. रस्ते,ड्रेनेज पाणी आदी समस्या गंभीर झाल्याने लाखो नागरिकांना दररोज जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ओबडधोबड कामे करून ठेकेदार व अधिकारी संगनमताने कोट्यवधी रुपयांची मलिदा खात आहेत. निकृष्ट कामामुळे पाणी मिळत नाही. रस्ते अपुरे पडत आहेत वाहतूक कोंडी वाढली आहे.बकालपणा वाढला आहे. त्यामुळे तातडीने विकास आराखडा मंजूर करण्यात यावा.
शेजारच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विकास आराखडा मंजूर करून सभोवतालच्या गावांचा विकास केला. मात्र पुणे महापालिकेने मात्र गावे वाऱ्यावर सोडली आहे.

See also  लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ