मुंबई : या आठवड्यात, कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय ज्ञान-आधारित गेम शोमध्ये KBC ज्युनियर्स म्हणून 8 ते 15 वर्षे या वयोगटातील हुशार मुले स्पर्धक म्हणून येणार आहेत. ही मुले आपली हुशारी दाखवतील आणि थरारक आव्हानेही पेलताना दिसतील. या सगळ्या डोकेबाज मुलांमध्ये प्रनुशा थामके ही विदर्भातून आलेली सहावीत शिकणारी एक बेधडक आणि प्रसन्न मुलगी देखील आहे. होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी तिने खूप गप्पा मारल्या. आपल्या माता-पिता आणि बहिणीसह या कार्यक्रमात आलेली प्रनुशा अत्यंत निर्धाराने हॉटसीटवर विराजमान झाली.
गेम हळूहळू रंगत असताना या छोट्या मुलीने श्री. बच्चन यांच्याशी एक हलका फुलका क्षण शेअर केला. स्वतःची ओळख तिने ‘सुपरपॉवर बाथरूम सिंगर’ अशी करून दिली. आपल्या शैलीत तिच्याशी बोलताना श्री. बच्चन म्हणाले, “या जगात असे कुणीच नसेल, जो बाथरूम सिंगर नसेल.” यातून गप्पांना एक रोचक वळण मिळाले. त्यावेळी बिग बींनी त्यांच्या परिचयाच्या एका गायकाचा किस्सा सांगितला. “एक गायक आहे, जो गावात राहतो. त्याला गायला खूप आवडायचे. तो ट्रॅक्टर चालवायचा आणि त्याच्या सुरात सूर मिळवून गात राहायचा.”
आठवणींच्या ओघात श्री. बच्चन यांनी लहानपणीचा एक धाडसी किस्साही सांगितला. ते म्हणाले, “गार हवेसाठी आम्ही आमच्या टेबल फॅनच्या पुढ्यात बर्फाचे तुकडे ठेवायचो. काही वर्षांनी आमच्या घरी फ्रिज आला. तो उघडला तेव्हा आमच्या लक्षात आले की तो आतून गार गार आहे. आम्ही त्यावेळी लहान होतो आणि एके दिवशी आम्ही फ्रिजमध्ये अडकलो आणि फ्रिजचे दार लॉक होऊन गेले.” त्यानंतर त्यांनी हसत हसत सांगितले की, “आम्ही आरडाओरडा केला, तेव्हा कोणी तरी येऊन आम्हाला बाहेर काढले. गरमीतून वाचण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार असायचो.” जाता जाता त्यांनी प्रनुशाच्या छोट्या बहिणीला ‘तू असे करू नकोस’ असा खेळकर सल्लाही दिला. जे ऐकून प्रेक्षक खूप हसले. त्या चुणचुणीत मुलीनेही तत्काळ उत्तर दिले, “आमच्या फ्रिजचा अजून तसा वापर झालेला नाही.”
या भागात जिव्हाळा, हास्य आणि किश्श्यांची जी देवाणघेवाण झाली, त्यामुळे हा भाग नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.
बघा कौन बनेगा करोडपती ज्युनियर्स, महान अमिताभ बच्चनसह सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!