औंध : औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय मोहल्ला कमिटीच्या बैठकीमध्ये मेट्रोच्या कामामुळे सुरू असलेल्या समस्या, सुतारवाडी परिसरातील कचरा व पाणी समस्या, बाणेर बालेवाडी परिसरातील अपूर्ण रस्ते व वाहतूक समस्या यावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले.
औंध क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मोहल्ला कमिटीच्या बैठकीमध्ये अधिकारी व नागरिक संवाद साधण्यात आला. सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी यावेळी नागरिकांच्या समस्या तोंडी व लेखी स्वरूपात घेतल्या. तसेच समस्या तातडीने सोडवण्यासाठी चे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
औंध येथील मोटार परिवहन पोलिसांच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात राडाराडा टाकण्यात आला आहे. यामुळे पोलीस वसाहती मधील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच इंदिरा गांधी शाळेजवळ टाकण्यात आलेल्या राडाराड्यामुळे सुरक्षा भिंतीवरून शाळेच्या आवारात येणाऱ्या मद्यपी लोकांचा त्रास होत असल्याचे बाब यावेळी सचिन कोपकर यांनी निदर्शनास आणून दिली. सचिन वाडेकर यांनी यावेळी कारवाईची मागणी केली.
मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात आल्याने पावसाळ्यात या परिसरातील पाणी शाळेच्या आवारात तसेच पोलीस वसाहतीमध्ये शिरते. स्मार्ट सिटी ने टाकलेला हा राडारोडा तातडीने उचलण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच अनधिकृत रस्त्यावर भरणाऱ्या आठवडे बाजारांवर प्रत्येक आठवड्याला कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली.
नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवल्याबद्दल मोहल्ला कमिटीच्या वतीने कार्यतत्पर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. या बैठकीमध्ये औंध बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.