पालिकेच्या नाकावर टिच्चून रस्त्यांवर अनधिकृत आठवडे बाजार सुरूच

औंध : पुणे महानगरपालिकेच्या नाकावर टिच्चून औंध बाणेर पाषाण परिसरात राजकीय कार्यकर्त्यांचे अनाधिकृत पादचारी मार्ग व रस्त्यावर भरणारे आठवडे बाजार सुरूच असून सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशानंतरही कारवाई होत नसल्याचे सध्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ३६ आठवडे बाजारांपैकी फक्त ९ आठवडे बाजार अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. मोहल्ला कमिटीच्या बैठकीमध्ये याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला होता. आठवडे बाजार मुळे नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असून रस्त्यावर भरणारे अनधिकृत आठवडे बाजारांवर कारवाई करण्यात यावी. तसेच पालिकेचे भुईभाडे देखील आठवडे बाजार चालवणाऱ्यांकडून वसूल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती.

यानंतर सहाय्यक आयुक्त औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय यांनी अतिक्रमण विभागाला अनाधिकृत आठवडे बाजारांवर सातत्याने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. रस्त्यांवर आठवडे बाजार लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देऊ नये कारवाई होत नसल्याने अतिक्रमण विभागाकडून एक प्रकारे अनाधिकृत रस्त्यावरील आठवडे बाजारांना एक प्रकारे पाठबळ दिल्याचे चित्र सध्या निर्माण होत आहे.

आठवडे बाजारामध्ये विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे बॅनर झळकत असून या कार्यकर्त्यांच्या राजकीय आशीर्वादाने हे आठवडे बाजार जोमाने रस्ता अडवून सुरू असतात. या बॅनर वरील कार्यकर्त्यांवर देखील दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. नागरिकांनी वारंवार प्रश्न उपस्थित करूनही आठवडे बाजार भरवले जात असून बेकायदेशीर आठवडे बाजार भरवणाऱ्या चालक व कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाची आढावा बैठक संपन्न