पुणे : शहरभर जलक्रीडेसह रंगांची उधळण करून रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा असली तरी आपुलकी प्रतिष्ठान आणि भारती विद्यापीठ मॉर्निंग ग्रुपने यंदा नैसर्गिक कोरड्या रंगांची उधळण करून अनोखी रंगपंचमी साजरी केली.
“आपली संस्कृती जपूया आणि पुढे नेऊया” या उद्देशाने जलवाचवा आणि पर्यावरणपूरक रंगांचा संदेश देत हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. सकाळी ग्रुपच्या सदस्यांनी नैसर्गिक गुलाल व फुलांच्या पाकळ्यांसह एकमेकांना रंग लावून सणाचा आनंद घेतला. पाण्याचा अपव्यय टाळत त्यांनी पर्यावरणपूरक पद्धतीने रंगपंचमी साजरी केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण काळे यांनी नागरिकांना संदेश दिला, “रंगपंचमी म्हणजे जलसंपत्तीचा अपव्यय न करता आनंद लुटण्याचा सण. नैसर्गिक रंगांचा वापर केल्याने त्वचेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही आणि पाणीही वाचते. आपली संस्कृती आणि सण साजरे करतानाच पर्यावरणाचे भान ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.”
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांनीही कोरड्या रंगांची रंगपंचमी साजरी करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. आपुलकी प्रतिष्ठान आणि भारती विद्यापीठ मॉर्निंग ग्रुपचा हा उपक्रम पर्यावरण रक्षणासोबतच पारंपरिक सण साजरा करण्याचा संदेश देणारा ठरला.
घर ताज्या बातम्या आपुलकी प्रतिष्ठान आणि भारती विद्यापीठ मॉर्निंग ग्रुपतर्फे पर्यावरणपूरक रंगपंचमी उत्साहात साजरी