विद्यापीठ चौकातील पुलाची एक बाजू एक मे रोजी वाहतुकीसाठी खुली होणार – आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची माहिती

पुणे : पुणे विद्यापीठ चौकामधील ब्रेमेन चौक ते ई-स्केअर दरम्यानचा पूल येत्या एक मे रोजी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे  छत्रपती शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या पुण्यासंदर्भातील प्रश्नांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी भाजपचे दत्तात्रय खाडे, गणेश बागडे, रवींद्र साळेगावकर, सुनील पांडे आदी उपस्थित होते.

विद्यापीठ चौकातील पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. दरम्यान या चौकात बाणेर आणि राजभवनकडे येणाऱ्या पुलाचे काम ऑगस्टपर्यत पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिरोळे यांनी यावेळी सांगितले.

पुणे शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात यावे अशी मागणी विधानसभेत केल्याचे सांगत शिरोळे पुढे म्हणाले की, “पुण्यातील सीसीटीव्ही हे पोलीस, महानगरपालिका, मेट्रो आणि अन्य काही खासगी संस्थांच्या माध्यमातून चालवण्यात येतात. या कॅमेऱ्यांच्या दर्जामध्ये फरक आहे. त्याची देखभाल देखील होत नाही हे लक्षात आले.  गुन्ह्यांना आळा घालणे, वाहतुकीचा प्रश्न सोडवणे यासाठी सीसीटीव्ही हा महत्वाचा घटक झाला असून पुण्यात सध्या १० हजार कॅमेरे आहेत. भविष्यात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम ठेवायची असले तर  पुण्यात आणखीन १० हजार कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. पोलिसांच्या दृष्टीने महत्वाचे असणारे निर्णय घेणे शक्य व्हावे, असे धोरण असायला हवे हे लक्षात घेत सीसीटीव्हीसाठीचे सर्वसमावेशक धोरण  येत्या महिन्याभरात करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.”

सर्व सरकारी रुग्णायालयात मेडिकल तज्ज्ञ नाहीत, त्यासाठी आपण जर आऊट सोर्सिंग करू शकलो, तर त्याचा फायदा मिळू शकतो असा विचार करीत त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शिरोळे म्हणाले. ससून रुग्णालयामध्ये प्रशासकीय स्थिरता नाही, अनेकदा तिथली एमआरआयची सुविधा बंद असते, त्यामुळे रुग्णांना बाहेर जावे लागते. तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याची सूचना सरकारला केली असल्याचे शिरोळे म्हणाले.  मुंबईमध्ये वेगाने विकास होत आहे, नवी मुंबईमध्ये विमानतळ होत आहे, त्यामुळे पुणे-मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर प्राधिकरण स्थापन करण्याची  मागणी केल्याची माहिती शिरोळे यांनी दिली.

यासोबतच अंमली पदार्थांचे वाढते सेवन लक्षात घेत त्यामध्ये सोशल ऑडिट करण्याची मागणी सभागृहात केली आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महापालिकेमध्ये विलीनीकरण करण्याच्या संदर्भात येत्या १५ दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अध्येक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.

जीबीएस रुग्णांसाठी अनुदानात वाढ मिळावी अशी मागणी मी अधिवेशानादरम्यान केली होती यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जीबीएस रुग्णांना होणारा त्रास तसेच रुग्णाच्या नातेवाईकांचा होणारा खर्च याचा विचार करून आयुष्मान योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना याद्वारे २ लाखापर्यंत दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन सभागृहाला दिले. शिवाय एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत ३ महिने वाढवा अशी मागणी मी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांकडे केली होती तिच्यावरही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत वाढवून मिळाल्याने सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला. अधिवेशनात वेगेवेगळे विषय मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल शिरोळे यांनी समाधान व्यक्त केले.

See also  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने रायगड किल्ल्यावर "तुतारी" पक्ष चिन्हाचे अनावरण