पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सरचिटणीस किशोर शिंदे यांच्या नेतृत्वात पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
कोथरूड कर्वेनगर परिसरामध्ये अनेक इमारतींना भोगवटा पत्र देण्यात आले आहे. इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिले आहेत तसेच नागरिक देखील या इमारतींमध्ये राहायला आले आहेत. परंतु हे नागरिक अजून देखील मिळकत कर भरत नाहीत. नागरिकांना मिळकत कर लावण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. अवस्तव पैशांची मागणी विकसित व रहिवाशांकडे केली जात असल्याचे अनेक नागरिक सांगतात.
कोथरूड कर्वेनगर परिसरामध्ये सुमारे 700 हून अधिक भोगवटा पत्र मिळालेल्या फाईल कर्वे रोड क्षेत्रीय कार्यालयात पडून आहेत. हजारो नागरिकांचे कर दोन-तीन वर्षाहून अधिक कालावधी झाला तरी लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे एकदम दोन-तीन वर्षांचा मिळकत कर लावल्यावर नागरिकांना ही रक्कम दंडासह भरावी लागणार आहे. यामुळे कोट्यावधी रुपयांचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागेल. तसेच पालिकेचे देखील उत्पन्न यामुळे वसूल होण्यास अडथळे निर्माण होणार आहेत. भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या इमारतींना कर लावण्यासाठी अवास्तव पैशांची मागणी केली जात आहे याची चौकशी करण्यात यावी तसेच नागरिकांना मिळकत कर लावून आकारण्यात यावा व भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी मनसे राज्य सरचिटणीस किशोर शिंदे यांनी केली. तसेच पुणे महानगरपालिकेच्या बुडीत करासाठी मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा देखील इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी मनसे नेते राजेंद्र वागस्कर, मनसे राज्य सरचिटणीस एडवोकेट गणेश सातपुते, बाळा शेडगे, अजय शिंदे, साईनाथ बाबर, प्रकाश कनोजिया, विनायक कोतकर आदी उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांना याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी तसेच नागरिकांना मिळकत कर लावून देण्याची व्यवस्था करावी असे आदेश दिले