खडकवासला : केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र (सी.डब्ल्यू.पी.आर.एस.) १४ जून २०२५ रोजी आपला १०९ वा स्थापना दिन साजरा करत आहे. ज्यामध्ये संस्थेने जल क्षेत्रात केलेले विविध उपक्रम, संशोधन सुविधा आणि सेवांचे प्रदर्शन आयोजित केले जात असून दरवर्षी प्रमाणे या दिवशी नागरिकांना कार्यक्रम पाहण्यासाठी केंद्रामध्ये मुक्त प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती संशोधन केंद्राचे नवनिर्वाचित संचालक डॉ. प्रभात चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र ही जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक प्रमुख जल संशोधन संस्था असून १९१६ पासून राष्ट्रीय गरजांसाठी प्रामुख्याने जलसंपदा, वीज आणि किनारी क्षेत्रांमध्ये मूलभूत आणि उपयोजित संशोधनाद्वारे सेवा देऊन देशाची सेवा करत आहे. डॉ. चंद्रा म्हणाले की, या केंद्राचा सर्व राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पांमध्ये मजबूत ठसा असून संशोधन केंद्र शेजारील देशांमध्ये अनेक प्रकल्पांनाही सेवा देत आहे. अलीकडेच या संस्थेने भव्य वाधवान बंदर तसेच नवी मुंबई विमानतळाच्या विकासासाठी योगदान दिले आहे. आणि सर्वात मोठा किनारी जलाशया साठीचा ‘कल्पसर प्रकल्प’ ही आता प्रगतीपथावर आहे. उत्तम परिणाम साधण्यासाठी प्रकल्पांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणे देखील करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. याव्यतिरिक्त भविष्यासाठी जलशक्ती मध्ये शाश्वत आणि अनुकूल उपाय विकसित करण्यासाठी हवामान बदलाच्या परिणामांचा अभ्यास तसेच क्षारता प्रवेश आणि GLOF या इतर संशोधन क्षेत्रांवर सी.डब्ल्यू.पी.आर.एस. लक्ष केंद्रित करणार असून धरण सुरक्षेशी संबंधित पैलूंसाठी एक आधुनिक केंद्र विकसित केले जाणार असल्याचे चंद्रा यांनी सांगितले.
१४ जून रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आपला १०९ वा स्थापना दिवस साजरा करीत असून राष्ट्रीय जल अकादमीचे मुख्य अभियंता डी. एस. चासकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात चासकर यांच्या “जल प्रशासन” या विषयावरील व्याख्यानाने होईल आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा, वृक्षारोपण, उपक्रम आणि प्रतिकृतींना भेटी हे कार्यक्रम पार पडतील. केंद्रा तर्फे देश विदेशात जल आणि विद्युत संदर्भात केलेले उल्लेखनीय कार्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना कळावे या साठी स्थापना दिना दिवशी पुण्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना खास बोलवण्यात आले असल्याचे चंद्रा यांनी नमूद केले. विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत संस्थेच्या सभागृहात केंद्राच्या संशोधन सुविधा जसे की, HMC लॅब, मुंबई बंदर, वेव्ह फ्ल्यूम (RSWG), यमुना नदी, रतले, पोलावरम, CMRT, मंगदेछु जल विद्युत प्रकल्प, कल्पसर प्रकल्प आणि केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र यांवरील माहितीपट बघता येणार आहेत.
सध्या सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांवर छोट्या-मोठ्या तब्बल पन्नास धरणांचे काम चालू असून त्यातील काही धरणांचे काम पूर्ण झाले असून काही धरणांचे काम प्रगतीपथावर आहे.
– प्रभात चंद्रा,
संचालक, केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र