बाणेर येथील सायकर मळा भागातील ड्रेनेज दुरुस्ती बाबत मनसेचे निवेदन

बाणेर : औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बाणेर भागातील औंध-बाणेर लिंक रोडवरील सायकर मळा येथे २०० ते ३०० लोकवस्तीच्या ठिकाणी ४ महिने झाले ड्रेनेज लाईन तुंबून त्याचे मैलापाणी तेथील रहिवाश्यांच्या घरामध्ये शिरत आहे. वारंवार ड्रेनेज तुंबून मैलापाणी घरात येत असल्याने त्याची दुर्गंधी घरांमध्ये पसरली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मैलापाणी तुंबून राहत असल्याने अनेकांना आपल्या घरामध्ये जाता येत नाही. जेथे मैलापाणी तुंबत आहे तेथे एमएसईबीच्या लाईटचा डीपी आहे त्यात पाणी जाऊन त्याचा प्रवाह पाण्यात उतरण्याची शक्यता आहे. परिसरांमध्ये डासांचा मोठ्या प्रमाणात वावर व उत्पत्ती वाढत आहे व त्याचा त्रास तेथे राहणाऱ्या रहिवाश्यांना होत आहे. यामुळे अनेक जण वारंवार आजारी पडत आहेत.


तेथील रहिवाशी यांनी ४ महिने झाले औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगूनही याकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नाही व दुरुस्तीही करत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.  नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता हे ड्रेनेज संबंधितांकडून त्वरित दुरुस्त करून घ्यावे. जर येत्या ४८ तासामध्ये ड्रेनेज दुरुस्त झाले नाही तर होणाऱ्या अपघातास किंवा होणाऱ्या रोगराईमुळे कोणी दगावल्यास आपणास जबाबदार धरले जाईल व मनसे स्टाईल खळ्खट्याक आंदोलन केले जाईल याची आपण नोंद घ्यावी. अश्या प्रकारचे निवेदन  महापालिका सहाय्यक आयुक्त, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय,  महापलिका आयुक्त, पुणे मनपा, यांना प्रत्यक्ष भेटून मनुष्याच्या वतीने देण्यात आले. 

यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण,  उपविभागाध्यक्ष पांडुरंग सुतार, विभाग सचिव संदीप काळे, शाखाध्यक्ष अमर अढाळगे, अनिल व्हटकर, किशोर इंगवले, मारुती बनकर, संतोष कळमकर, रामदास फणसे, इंदुबाई काळे, ज्योती फणसे, शुभांगी सायकर, कविता शिंदे, लहू सयकर, किसन शिंदे, नितीन भांडवलकर, पांडुरंग शिंदे, कुणाल मुंडे, सज्जन नरवाडे, अनिकेत स्वामी व महाराष्ट्र सैनिक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना व पालकांना येणाऱ्या समस्या निराकरणासाठी समुपदेशकाची व्यवस्था-मंडळाच्या विभागीय अध्यक्षा मंजुषा मिसकर यांची माहिती