पुणे : चांदणी चौकमध्ये आकाश चिन्ह विभागाच्या वतीने परवानगी देताना राजरोसपणे सुरू असून याबाबत कितीही तक्रारी करण्यात आल्या तरी सुद्धा कारवाई न करता संबंधित व्यावसायिकाला अभय देण्याचे अजब काम राजरोस सुरू आहे. पुणे महापालिका हद्दीतील अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश असतानाही आकाश चिन्ह विभागातील लागेबांधे असलेल्या अधिकाऱ्यांची मर्जी राखत चांदणी चौक परिसरात धोकादायकपणे अनाधिकृतपणे परवानगी देण्यात आलेल्या फलकाचा व्यवसाय जोरात सुरू आहे.
पुणे चांदणी चौकालगत लोहिया जैन अवेन्यू, उजवी भुसारी कॉलनी, एचडीएफसी बँके बाहेर पौड रोड कोथरूड बहुमजली इमारतीच्या शेजारी संबंधित व्यावसायिकाने अनधिकृत होर्डिंग उभारले असून यावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला जात असतानाही कोणतीही कार्यवाही केली जात नाही. याबाबत अर्जदार जयदीप पडवळ दि. ०३/०६/२०२४ रोजी आपल्या खात्याकडे संबंधित अनधिकृत जाहिरात फलकाबाबत लेखी तक्रार करण्यात आली होती. संबंधित जाहिरात व्यवसायकाने कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर वृक्षतोड केली होती. त्याप्रमाणे वृक्ष प्राधिकरण विभागाकडून पंचनामा करून संबंधित व्यवसायिकाला नोटीस काढून आपल्या खात्याकडे तसा लेखी अहवाल सादर केला होता परंतु आकाश चिन्ह विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याऱ्यांनी आर्थिक व्यवहार केल्याने त्या गार्डन विभागाच्या अहवालाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करुन अप्रत्यक्षरीत्या त्या जाहिरात व्यवसायिकाला मदत केली असल्याचाही आरोप अर्जदाराच्या वतीने करण्यात आला आहे.
संबंधित व्यावसायिकाने या ठिकाणी होर्डिंग लावताना पुणे महापालिकेच्या उद्यान विभाग आणि पुणे पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागाची परवानगी घेणे आवश्यक असताना कोणत्याही प्रकारचे परवानगी न घेता संबंधित ठिकाणी होर्डिंग उभे करून व्यवसायाला सुरुवात केली आहे. मुळात चांदणी चौकातील वाऱ्याचा वेग लक्षात घेता संबंधित रस्त्यावरील हे होर्डिंग धोकादायक होण्याची शक्यता असल्यामुळेच पुणे पोलिसाच्या वाहतूक विभागाचे परिणाम हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले नाही. याच कारणास्तव पुणे पोलिसांच्या वतीने परवाना नाकारण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या ‘आकाश चिन्ह’ विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमताने या भागात होर्डिंग लावण्याचा प्रकार केला आहे.
पुणे महानगरपालिका आकाशचिन्ह परवाना २०२२च्या नियमावलीनुसार त्या जाहिरात व्यावसायिकावर कारवाई होणे अपेक्षित असतानाही जाणीवपूर्वक नियमावलीला अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. पुणे महानगरपालिका आकाशचिन्ह परवाना २०२२च्या नियमावलीनुसार संबंधित जाहिरात व्यवसायिकावर आणि सहकार्य करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.