पुणे (प्रतिनिधी) :पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढावी आणि मोठ्या आकाराच्या विमानांना ये-जा करता यावी, यासाठी आवश्यक असणाऱ्या धावपट्टी विस्तारीकरणाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामालाही वेग येणार आहे. कारण सदरील काम ‘फास्टट्रॅक’वर करण्याचे निर्देश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. तसेच यात लोहगावकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून पुणे महापालिका हवाई दलाशी समन्वय साधून हा रस्ता करणार आहे.
काहीच दिवसांपूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाला परवानगी मिळाली होती. त्यानंतर विस्तारीकरणासाठी आवश्यक असणारे भूसंपादन, लोहगावचा पर्यायी रस्ता करणे आणि इतर तांत्रिक बाबी याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सविस्तर बैठक बोलावून विविध निर्देश दिले. या बैठकीला विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विमानतळाचे संचालक संतोष ढोके, हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत धावपट्टी विस्तारीकरण ‘फास्टट्रॅक’वर करण्याचे निर्देश देऊन इतर बाबींचाही केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी आढावा घेतला.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पुणे विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात येणार असून यासाठी सैन्य दलाची आणि खासगी जागा प्रत्यक्षात किती लागणार आहे? याबाबत सविस्तर चर्चा केली. शिवाय हवाई दलाची विमानतळासाठी आवश्यक असणारी जागा ही विमानतळ प्राधिकरणाला मिळावी, या संदर्भातही चर्चा होत सदरील मागणीचा प्रस्ताव सैन्य दलाच्या मुख्यालयाकडे पाठवण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. हवाई दलाच्या या जागेत विमानतळाच्या व्यवस्थापनासंदर्भात यंत्रणा उभी करणे शक्य होणार आहे. तसेच या बदल्यात विमानतळ प्राधिकरणाकडून हवाई दलाला पर्यायी जागा देण्यात येणार असून याबाबतच्या आस्थापनेचा खर्च विमानतळ प्राधिकरणाकडून केला जाणार आहे.
‘महत्वाची बाब म्हणजे धावपट्टी विस्तारणीकरणामुळे विश्रांतवाडी ते लोहगाव हा विमानतळालगत असणारा रस्ता बाधित होणार असल्याने त्याला तातडीने पर्यायी मार्ग तयार करावा लागणार आहे. हा नियोजित पर्यायी रस्ता हवाई दलाच्या जागेतून जाणार आहे. या रस्त्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली आणि या पर्यायी रस्त्याचा खर्च पुणे महापालिका करणार आहे. महापालिका आणि हवाई दल याबाबत समन्वय ठेवणार असून वेगाने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे’, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.
धावपट्टी विस्तारीकरण ‘फास्टट्रॅक’वर…
पुणे विमानतळाची तातडीची गरज लक्षात घेता विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार वेगाने होणे आवश्यक आहे. म्हणूनच बैठक घेऊन ही प्रक्रिया ‘फास्टट्रॅक’ने करण्याचे निर्देश दिले आहेत. पुरंदर विमानतळाची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी पुणे शहर आणि परिसराची तातडीची गरज लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढणे हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच ही सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विस्तारासाठीचे भूसंपादन राज्य सरकारकडून वेगाने केले जाणार आहे, मात्र त्यासाठीची पूर्व पूर्तताही वेळेत होणे गरजेचे आहे. म्हणूनच या बैठकीत सविस्तर आढावा घेत वेगवेगळे निर्देश दिले आहेत.
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री
घर ताज्या बातम्या पुणे विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणाचे काम आता ‘फास्टट्रॅक’ वर : केंद्रीय मंत्री मुरलीधर...