खडकवासलाः बालगंधर्व रंगमंदिर कलादालनामध्ये सुमारे आठ ते नऊ कलाकारांनी सहभाग घेऊन नुकतेच चित्र व छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी चित्र प्रेमिनी गर्दी केली होती.
प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले. चित्रकार शशिकांत डोळस यांनी सूत्रसंचालन केले. अरुण काळे यांनी स्वागत केले. गणेश ढोले, प्रमोद कांबळे यांनी संयोजन केले.कार्यक्रमावेळी लाहोटी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व सहभागी कलाकारांचे कौतुक केले .
यावेळी लाहोटी म्हणाले, “ कलाकारांनी दूरदृष्टी ठेवून सामाजिक हेतू ठेवून कलेची उपासना करावी. कलाकारांनी एकत्र येऊन आपल्या कलेची जोपासना करायला हवी ही काळाची गरज आहे”
नवोदित चित्रकारांनी स्वतंत्र चित्र प्रदर्शन आयोजित करण्याऐवजी अनेकांनी एकत्र येऊन प्रदर्शनाचे नियोजन केल्यास एक चांगले काम होऊन आपण समाजापर्यंत पोहोचू शकतो असे मत चित्रकार अरुण काळे यांनी व्यक्त केले.
हे प्रदर्शनात निसर्ग चित्र,अमृत चित्र, रचनात्मक चित्र, व्यक्तिचित्र अशा विविध चित्रांचा समावेश होता. छायाचित्रकार प्रदीप डोळस यांची अनेक छायाचित्रांचा समावेश या प्रदर्शनात होता.चित्रकार शशिकांत डोळस, अरुण काळे, गणेश ढोले, प्रताप सिंह शिंदे, राहुल वाघमारे, प्रमोद कांबळे, सिद्धार्थ इंगळे, प्रदीप डोळस, प्रज्ञा कांबळे यांच्या विविध विषयांवरील चित्रांचा समावेश होता. गणेश ढोले यांनी आभार मानले.