पुणे, : राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने महामंडळाने १७ मार्च २०२३ पासून महिला सन्मान योजना कार्यान्वित केली असून २३ मार्चपर्यंत पुणे विभागातील बसेसमधून एकूण ३ लाख १० हजार १३८ महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
जिल्ह्यात शिवाजीनगर आगारातून १६ हजार ९०२, स्वारगेट १५ हजार ५५८, भोर २७ हजार १९२, नारायणगाव ५२ हजार ८८, राजगुरुनगर ४१ हजार ५३१, तळेगाव १४ हजार १०५, शिरुर १९ हजार ५२२, बारामती ४० हजार ९५२, इंदापूर ३२ हजार ३०९, सासवड १५ हजार ८१७, दौंड १० हजार २५६, पिंपरी-चिंचवड ८ हजार ९९६, एमआयडीसी १४ हजार ९१० असे एकूण जिल्ह्यात ३ लाख १० हजार १३८ महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यातून एसटी महामंडळाला ८९ लाख १४ हजार १३८ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वीही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतींची प्रतिपूर्ती रक्कम राज्य शासनाकडून महामंडळाला देण्यात येत आहे, अशी माहिती पुणे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे.