मोह आणि भिती मुळे सायबर क्राईमला सामान्य नागरिक पडतात बळी : वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत

बालेवाडी : बाणेर पोलिस स्टेशन, बाणेर पोलिस वाहतूक विभाग आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे पोलिस-नागरिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी बाणेर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी बाणेर बालेवाडी येथील नागरिकांबरोबर संवाद साधला.


हल्ली वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांबद्दल सविस्तर माहिती चंद्रशेखर सावंत यांनी दिली. पैशाच्या अति मोहामुळे सायबर सापळ्यात नागरिक अडकतात. सायबर भामटे नागरिकांना भिती दाखवून, डिजिटल अरेस्ट सारखे खोटे चित्र उभे करून गंडा घालतात. समाजातील सर्व घटक, तरुण- वयस्कर कुणीही याला अपवाद नाहीत. चंद्रशेखर सावंत यांनी अनेक घटनांची माहिती देऊन काय काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.


सोसायटीत व  घरकाम करणाऱ्या व्यक्तींची  योग्य ती चौकशी करून, त्यांचे डाक्युमेंटस घेऊन त्यांना कामावर ठेवले पाहिजे. समाज माध्यमांतून विचार न करता खाजगी माहिती टाकली जाते व तिचा चोरटे फायदा घेतात. याबाबत पण काळजी घेतली पाहिजे.
बाणेर बालेवाडी येथील विविध विषयांवर नागरिकांनी प्रश्न विचारले. त्यावर समर्पक उत्तरे देऊन सावंत यांनी  ११२ नंबरवर पोलिस २४ तास नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले.


बाणेर बालेवाडी येथील अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची नागरिकांनी प्रशंसा केली.
फेडरेशनचे अशोक नवाल, ॲड. माशाळकर, दफेदार सिंह, ॲड इंद्रजित कुलकर्णी, मोरेश्वर बालवडकर, विकास कामत ,आशिष कोटमकर ,अस्मिता करंदीकर, वैभव आढाव, यश चौधरी, डॉ. सुधीर निखारे, व रमेश रोकडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन शुभांगी चपाटे यांनी केले.

See also  उद्या हडपसर मध्ये महिला शिवसेना मेळावा