पुणे : विविध पालख्या आणि संप्रदायांमधील प्रत्येक वारकऱ्यापर्यंत नेत्रसेवा पोहोचावी यासाठी डॉ. दुधभाते नेत्रालय आणि आदित्य फाउंडेशन यांच्यावतीने अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील हजारो वारकऱ्यांना ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. दुधभाते नेत्रालयाने चालता-फिरता नेत्ररुग्ण दवाखाना म्हणजेच सुसज्ज रुग्णवाहिका तयार केली आहे. दिवेघाटापर्यंत हि सेवा प्रदान करण्यात येणार आहे.
या मोफत नेत्रसेवेअंतर्गत नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांकडून नेत्रतपासणी केली जाते तसेच आवश्यक सल्ला दिला जातो. ही सेवा गेल्या १२ वर्षांपासून नियमित स्वरूपात वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली जात असून, यावर्षीदेखील विठ्ठल चरणी सेवा अर्पण करण्याची तयारी करण्यात आली आहे.
आदित्य फाउंडेशन आणि सुप्रसिद्ध डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटिना सेंटर, सिंहगड रोड, माणिकबाग, पुणे हे संस्था गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मोफत नेत्रसेवा पोहोचवण्याचा प्रयत्न अविरतपणे करत आहेत.
या सेवेमुळे हजारो वारकऱ्यांना डोळ्यांची काळजी घेण्याची संधी मिळते आणि नेत्ररोगांबाबत आवश्यक जागरूकता निर्माण होते. या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. दुधभाते नेत्रालय आणि आदित्य फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. विठुरायाच्या चरणी समर्पित भावनेतून आणि सेवा हीच खरी भक्ती मानून चालवला जाणारा हा उपक्रम हा सामाजिक जबाबदारीचा उत्कृष्ट नमुना ठरत आहे.