छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ समस्या आणि विकासकामे मार्गी लावण्याबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे आयुक्तांसोबत बैठक

पुणे : छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील रस्ता रुंदीकरण, स्वच्छता, विहिरी संवर्धन, महापालिका वसाहत पुनर्निर्माण आदी विकासकामे मार्गी लावण्याच्या  दृष्टीने महत्त्वाच्या ३४ मुद्द्यांवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या समवेत आमदार शिरोळे यांनी आज प्रदीर्घ चर्चा केली. छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील विकासकामे आणि अन्य नागरी सुविधांच्या कामांची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशा सूचना आयुक्त राम यांनी विविध खात्यांच्या प्रमुखांना दिल्या. शिवाय कामांच्या प्रगतीचा आढावा सहा महिन्यांनी घेतला जाईल, असेही आश्वासन आयुक्तांनी, आमदार शिरोळे यांना दिले.

महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाचे आधुनिकीकरण करणे आणि इनोव्हेशन हबची उभारणी करणे, जंगली महाराज रस्त्यावरील मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्प मार्गी लावणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडचे रुंदीकरण करणे, औंधमधील भाजी मंडई, जलतरण तलाव, ड्रेनेज लाईन सुधारणा आदी कामे, छत्रपती संभाजी महाराज उद्यानात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविणे आणि उद्यानाचे सुशोभीकरण करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, कचऱ्याचे निर्मुलन करणे आणि अतिक्रमण हटविणे, महापालिका शाळांच्या इमारतीत दुरुस्त्या करणे, महापालिकेची रुग्णालये सुसज्ज करणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल करणे, मुळा आणि मुठा नद्यांचे संवर्धन करणे,  रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि विहिरींचे जतन आणि संवर्धन करणे, वाकडेवाडी, पांडवनगर येथील महापालिका वसाहतींचे (कॉलनी) पुनर्निर्माण करणे, भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणि केबल व्यवस्थापन यांसारखे नागरिकांशी निगडित अनेक विषय वेगाने मार्गी लागतील, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

See also  पिंपरी-चिंचवडमध्ये आप आदमी पक्षाला नवे बळ – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त सुरेश गायकवाड यांचा पक्षप्रवेश!