कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळून कॅरेज वेमध्ये पार्किंगला परवानगी द्या!पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे वाहतूक पोलीस आणि महापालिकेला निर्देश

गरवारे महाविद्यालयाजवळ पे ॲन्ड पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था

कोथरूड : कोथरुड मधील कर्वे रस्त्यावरील संभाव्य वाहतूककोंडी टाळून, कॅरेज वेमध्ये स्थानिक व्यवसायिकांना वाहने पार्किंगसाठी परवानगी द्या. तसेच, स्थानिक व्यवसायिक आणि नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होत नाही, तेथे वाहतूक पोलिसांनी पाहाणी करुन नो पार्किंगचे बोर्ड काढावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले‌. तसेच, गरवारे महाविद्यालयाजवळ महापालिकेच्या मोकळ्या जागेत पे ॲन्ड पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

वनाज ते गरवारे दरम्यान मेट्रो आणि नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलाची कामे संपल्यामुळे कर्वे रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या रस्त्यावरील स्थानिक व्यावसायिकांनी केली होती. सदर मागणीच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली.

या बैठकीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, कोथरुड वाहतूक पोलीस निरीक्षक विश्वास गोळे, फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका, अजित धावडे, अजित सांगळे, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, रिपाइंचे ॲड. मंदार जोशी, मनसेचे हेमंत संभूस, शिवसेना ठाकरे गटाचे गजानन थरपुडे उपस्थित होते.

कोथरुड मधील कर्वे रस्त्यावरील खंडुजीबाबा चौक ते करिष्मा सोसायटीदरम्यानचा रस्ता ६० फुटांचा असल्याने या पूर्वी दुतर्फा वाहने उभी करण्यास महापालिका आणि पोलिसांनी परवानगी होती. मात्र, २०१८ मध्ये या रस्त्यावर वनाज ते गरवारे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले. त्यापाठोपाठ नळस्टॉप चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपुलासाठीही काम सुरू झाले. सदर दोन्ही प्रकल्पांचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील पार्किंग पूर्ववत करावे, अशी तेथील व्यावसायिकांची मागणी केली होती.

त्याअनुषंगाने आज महापालिकेत बैठकीत होऊन सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार संभाव्य वाहतूककोंडी टाळून कॅरेज वे उपलब्ध आहे, अशा भागांमध्ये वाहने पार्किंगला परवानगी द्यावी. तसेच, व्यवसायिक आणि नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होत नाही, अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांनी पाहाणी करुन नो पार्किंगचे बोर्ड काढून, व्यवसायिक आणि स्थानिक नागरिकांची समस्या सोडवावी; असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले‌.

See also  अखंड मराठा समाजाचे कार्यकर्ते विजय किसन बराटे यांचा कोथरूड मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

तसेच, भविष्यातील वाहने पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी गरवारे महाविद्यालयाच्या विरुद्ध बाजूस महापालिकेच्या जागेवर वाहने पार्किंगसाठी ‘पे ॲन्ड पार्क तत्वावर’ वाहनतळ सुरू करावे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने याची व्यवस्था उभी करावी, अशी सूचना ही नामदार पाटील यांनी आजच्या बैठकीत दिली. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या निर्णयावर सर्व व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.