मुंबई : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न म्हणजे संविधानावर, लोकशाहीवर हल्ल्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या घटनेच्या निषेधार्ह उच्च न्यायालयाजवळील हुतात्मा चौक आणि मंत्रालयाजवळील संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला वंदन करून आंदोलन करण्यात आले. देशाच्या सरन्यायाधीशांवर न्यायालयातच हल्ला करण्याचा प्रयत्न हा लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवरच प्रहार करणारा प्रकार आहे. महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या पाठीशी आम्ही आहोत असा संदेश यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला.
न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा जपणे हे प्रत्येक नागरिकाचे तसेच शासनाचे कर्तव्य आहे. न्यायालय हे समाजातील न्याय आणि संविधानिक मूल्यांचे अंतिम रक्षणकर्ते आहेत, आणि त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न आहे.सरन्यायाधीशावर अशा प्रकारच्या हल्ल्याचा प्रयत्न होणं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि संविधानाचा अपमान आहे. त्यांना दिलेल्या पदाला मान देण्याऐवजी या पदावर देखील दडपशाही करण्याचा प्रयत्न होत असेल ते देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेने याचा विरोध केला पाहिजे.
केंद्र सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच न्यायसंस्थेची सुरक्षितता आणि सन्मान अबाधित राहील यासाठी आवश्यक ती पावले तात्काळ उचलावीत. लोकशाहीचे बळ न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेच्या तत्त्वांवरच टिकून असते आणि या तत्त्वांचे रक्षण करणे आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. अशी भूमिका यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मांडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.