मोहननगर-सुस-बाणेर रोडवर सांडपाण्याच्या घाणीचा प्रश्न सुटेना, नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका

बाणेर : मोहन नगर, बाणेर पुणे – बिटवाईज कंपनीजजवळ भूमिगत गटाराच्या नालीचा पाईप फुटल्यामुळे मैला मिश्रित सांडपाणी  रस्त्यावर वहात आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

घाणेरड्या पाण्याचा सततचा ओघ आणि दुर्गंधीमुळे रहिवाशांचे जीवन दुर्वास झाले आहे. जाता-येता लोकांना हा दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. दोन महिने रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे. पालीका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत.

फुटलेल्या पाईप्सची साखळी:ही समस्या केवळ एका ठिकाणी मर्यादित नाही. बिटवाईज चौक ते मोहन नगर या मार्गावर सलग दोन ते तीन ठिकाणी गटारांचे पाईप फुटले आहेत, ज्यामुळे संपूर्ण परिसर एक ‘ओपन सेव्हर’ बनला आहे.
नागरिकांची मानसिक आणि शारीरिक यातना:”सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत हीच दुर्गंधी. खिडकी उघडायची तरी धास्त वाटते.वाहन चालवताना देखील या घाणीमुळे श्वास घेणे कठीण होते. अनेक वेळा तक्रार केल्या, पण कोणी ऐकलेच नाही. आमचे कर कुठे जात आहेत?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
आरोग्यावर होणारे परिणाम: सार्वजनिक आरोग्य तज्ञांच्या मते, सडलेल्या कचऱ्याच्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, हेपटायटीस ए, आणि चामड्याच्या इन्फेक्शनसारख्या अनेक संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. हवेत मिसळलेले किटाणू श्वासोच्छ्वासाच्या मार्गाद्वारे शरीरात शिरू शकतात.

मोहन नगर आणि बाणेर रोड परिसरातील रहिवाशी आता ठोस कृतीची मागणी करत आहेत. त्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत.  फुटलेले पाईप तातडीने बदलले जावेत. संपूर्ण क्षेत्राची स्वच्छता कामे झाली आहेत की नाही याची पडताळणी करण्यात यावी. अनावश्यक बांधकामामुळे ही समस्या निर्माण झाली असल्यास, तोड फोड करणार्या बिल्डरकडे खर्चाची भरपाई मागण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारच्या समस्यांस तोंड देण्यासाठी एक कायमस्वरूपी तपासणी यंत्रणा उभारण्यात यावी.

आरोग्य हा कोणत्याही नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि या अधिकाराचे उल्लंघन सहन केले जाणार नाही. प्रशासनाने आता लगेचच या समस्येकडे लक्ष द्यावे आणि मोहन नगर-बाणेर रोड परिसरातील नागरिकांची दुर्गंधीच्या त्रासातून मुक्त करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  राजकारणाविषयी अनास्था न दाखवता ब्राह्मण समाजाने राजकारणात सक्रिय व्हायला हवे - डॉ.गोविंद कुलकर्णी