होर्डिंगचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडीट करा, जिल्हाधिकाऱ्यांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेला आदेश

पुणे : मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील होर्डिंगचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी महापालिकेला दिले आहेत. 

मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील महाकाय लोखंडी जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 140 बाय 140 चौरस फुटांचा हा फलक क्षणार्धात कोसळल्याने जवळ असलेली वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले. या दुर्घटनेत 74 जण जखमी झाले आहेत.

या  पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी महापालिकेला सूचना दिल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस व नजीकच्या मान्सुनच्या हंगामात पडणाऱ्या पावसाची शक्यता विचारात घेऊन जीवित आणि मालमत्ता हानी व वाहतुकीसा अडथळा होऊ नये याकरिता परवानगी देण्यात आलेल्या सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट पुन्हा नव्याने करुन घेण्यास संबंधित होर्डिंगधारकास कळवावे.

त्याप्रमाणे ऑडीट केल्याचा दाखला 15 दिवसात सादर करण्यास सांगावे. महापालिका हद्दीतील  स्ट्रक्चरल ऑडीट न केलेले सर्व होर्डिंग अनधिकृत समजून होर्डिंग धारकास नोटीस द्यावी. होर्डिंग तात्काळ काढून टाकण्याची कार्यवाही करावी. तसेच सर्व अनधिकृत  होर्डिंगवर सक्त कारवाई करण्यात यावी. त्यामध्ये प्रामुख्याने धोकादायक, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या होर्डिंगवर तातडीने कारवाई करावी. नव्याने स्ट्रक्चरल ऑडीट केल्याचे प्रमाणित दाखला न सादर केल्यास अथवा यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडीट  न केलेल्या होर्डिंग धारकांना देण्यात आलेल्या नोटीसा, त्याबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा अहवालही जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला आहे.

See also  पुणे विभागातील जिल्हा वार्षिक योजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यस्तरीय बैठकीत आढावा