बाणेर :बाणेर येथील बाटा शोरूमच्या मागील लेनमध्ये नागरिकांकडून अनधिकृत वाहन पार्किंगबाबत नागरिकांच्या तक्रारीनुसार माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर व ट्रॅफिक विभागाचे एपीआय डोंगरे यांनी पाहणी केली.
आतील लेनमध्ये कारवाई होत नसल्यामुळे अनेक बाहेरील नागरिक गाड्या उभ्या करत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतो. यात प्रामुख्याने रिविरेसा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मातोश्री दगडाबाई रणवरे स्मृती सदन, गंगाई बिल्डिंग, पेनिन्सुला को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, अझालिया को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तसेच रेन्यू इलेक्ट्रॉनिक्स कंपनी परिसरातील नागरिकांनी या समस्येबाबत सातत्याने तक्रारी केल्या होत्या.
नागरिकांच्या या तक्रारीला त्वरित प्रतिसाद देत ट्रॅफिक विभागाचे एपीआय डोंगरे यांनी सदर ठिकाणी भेट देत पाहणी केली. पाहणीदरम्यान परिसरातील नागरिकांशी संवाद साधून समस्येची सविस्तर माहिती घेतली. या ठिकाणी अनधिकृत पार्किंगमुळे रस्त्यावरील वाहतुकीत अडथळा निर्माण होतो तसेच रहिवाशांना त्यांच्या सोसायट्यांमध्ये ये-जा करताना अडचणींना सामोरे जावे लागते, हे स्पष्टपणे जाणवले.
ट्रॅफिक विभागाशी समन्वय साधून येथील पार्किंगसंबंधी योग्य ती उपाययोजना तातडीने करण्यात येणार असून नागरिकांना सुसज्ज, सुरक्षित व स्वच्छ परिसर मिळावा यासाठी पुढील कार्यवाही सुरू करण्यात येईल अशी माहिती माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनी दिली.