विद्यार्थ्यांनी बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून नवीन आव्हानांना सामोरे जावे – केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

पुणे : विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाचा विचार करून नवीन आव्हानांना सामोरे जाणे आवश्यक आहे. येत्या २५ वर्षात भारत जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने पाऊल टाकत असताना या कार्यात युवा पिढीने योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले.

सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या २९ व्या दीक्षांत समारंभ प्रसंगी श्री. प्रधान बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे विश्वस्त रमाकांत लेंका, सचिव मिलिंद देशमुख उपस्थित होते.

पदवीधर विद्यार्थांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून केंद्रीय मंत्री श्री. प्रधान म्हणाले, जगभरात आज तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग यासारख्या तंत्रज्ञानात वाढ होत आहे. कृत्रिम बुद्धिमतेमुळे डेटा संगणन करणे सोपे झाले आहे. विद्यार्थ्यांनी या नव्या प्रवाहांची माहिती घेऊन आपले मार्ग निवडावे.

पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करावे. देशात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारा न होता नोकरी देणारा म्हणून पुढे आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

गोखले इन्स्टिट्यूट ही एक उत्तम संस्था आहे. देशात आर्थिक विषयाचे आरेखन करण्यामागे गोखले संस्थेचे मोठे योगदान आहे. या संस्थेत अर्थशास्त्र विषयाच्या संशोधनाबरोबरच विद्यार्थांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत असल्याबाबत त्यांनी संस्थेचे कौतुक केले.

*शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोखले संस्थेचे अभ्यासपूर्ण संशोधनाद्वारे मोठे योगदान – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील*

राज्यातील मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोखले संस्थेने अभ्यासपूर्ण संशोधन करून मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.

श्री. पाटील म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अहिंसा आणि वैधानिक मार्गाने गोपाळ कृष्ण गोखले यांनी योगदान दिले. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या प्रेरणेतून १९३० साली सुरू झालेल्या या संस्थेत आरोग्य, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, कृषी, सामाजिक विज्ञान यासारख्या विषयावर संशोधन होत आहे.

आपला देश जगात ५ वी आर्थिक महासत्ता बनला आहे. २०४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळून १०० वर्ष होतील. त्यावेळी आपण जगात पहिल्या ३ क्रमांकावर असू. विद्यार्थ्यांनी आपली सारी बुद्धिमत्ता स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी खर्च करावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात श्री. रानडे यांनी गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. ‘मेकिंग ऑफ अन इकॉनॉमिक सिटाडेल’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थितांना शांततेची शपथ देण्यात आली.

See also  पेरिविंकलचे विद्यापीठ होण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल:10 वी 12वी निरोप समारंभात तापकीर यांचे मनोगत