प्रभाग क्रमांक ९ मध्ये लहू बालवडकरांचा दहा दिवसांचा ‘गावभेट दौरा’ यशस्वी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बालेवाडी : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहू गजानन बालवडकर यांनी प्रभाग क्रमांक ९ मध्ये राबवलेला दहा दिवसांचा गावभेट दौरा आज बालेवाडी येथे उत्साहात आणि नागरिकांच्या व्यापक प्रतिसादात संपन्न झाला. घराघरांत जाऊन थेट संवाद साधण्यावर भर देणारा हा दौरा आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

महाळुंगे, सुस, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर आणि बालेवाडी या सात गावांमध्ये हा दौरा राबवण्यात आला. ११ व १२ डिसेंबर रोजी महाळुंगे येथून सुरू झालेल्या या दौऱ्याने २० डिसेंबर रोजी बालेवाडी येथे पूर्णविराम घेतला. प्रत्येक टप्प्यावर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने बालवडकर यांच्या जनसंपर्क मोहिमेला अपेक्षित बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.

दहा दिवसांच्या दौऱ्यात बालवडकर यांनी नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, स्थानिक प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेतल्या. रस्त्यांची खराब अवस्था, पाणीपुरवठ्याच्या समस्या, स्वच्छता व ड्रेनेज व्यवस्थेतील त्रुटी, अपूर्ण पायाभूत सुविधा तसेच स्थानिक पातळीवरील रोजगाराच्या संधी यांसारख्या मुद्द्यांवर नागरिकांनी थेट मते मांडली. या प्रश्नांची नोंद घेऊन प्रशासनाशी समन्वय साधत ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे या दौऱ्यात महिलांचा, युवकांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सक्रिय सहभाग दिसून आला.

यावेळी बोलताना लहू बालवडकर यांनी प्रभाग क्रमांक ९ च्या नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन विकासावर भर दिला. “नागरिकांच्या समस्या त्यांच्या दारात जाऊन समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधणे हीच माझी कार्यपद्धती आहे. ज्येष्ठांचे आशीर्वाद, युवकांशी झालेला संवाद आणि महिलांनी केलेले आपुलकीचे स्वागत यामुळे हा दौरा केवळ राजकीय संपर्कापुरता मर्यादित न राहता विश्वास निर्माण करणारा उपक्रम ठरला असून संवादातून विश्वास निर्माण होतो आणि त्या विश्वासातून जबाबदारी वाढते,” असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री व खासदार मुरलीधर मोहोळ तसेच आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील विकासकामांना गती दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, आगामी काळातही हा दौरा सातत्याने सुरू ठेवून प्रभागातील प्रत्येक वस्ती आणि प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार बालवडकर यांनी व्यक्त केला आहे.

See also  'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४' ला जुन्नर येथे सुरुवातपहिल्या दिवशीच्या कार्यक्रमातून इतिहास आणि कलासंस्कृतीचे सुंदर दर्शन

या दौऱ्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय वातावरण अधिक सक्रिय झाले असून, महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.