बाणेर : बाणेर येथील सर्वसामान्य कुटुंबातील सहा-सीटर चालक आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता जीवन चाकणकर यांना काँग्रेस पक्षाने खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही बाणेर परिसरात पक्षाची बाजू ठामपणे मांडत त्यांनी सातत्याने काँग्रेसचे कार्य सुरू ठेवले.
काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे, विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि थेट जनतेशी संपर्क ठेवणे या माध्यमातून जीवन चाकणकर हे कायम लोकांमध्ये कार्यरत राहिले. पक्ष टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी केलेले संघर्षपूर्ण आणि निष्ठावंत कार्य बाणेर परिसरात सर्वश्रुत आहे.
पक्षाशी असलेली एकनिष्ठता आणि बाणेरमध्ये काँग्रेस पक्ष मजबूत ठेवण्यात दिलेले योगदान लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने जात-पात न पाहता, ओबीसी समाजातून येत असतानाही जीवन चाकणकर यांना खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना जीवन चाकणकर म्हणाले, “मी पक्षासाठी प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठपणे काम केले. त्याची दखल घेत काँग्रेस पक्षाने मला जात-पात न पाहता खुल्या प्रवर्गात उमेदवारी देऊन ताकद दिली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
काँग्रेस पक्षाने दिलेल्या या संधीमुळे बाणेर परिसरात कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही पक्षात योग्य न्याय मिळतो, असा संदेश या निर्णयातून गेल्याचे बोलले जात आहे.
























