आचारसंहिता भंगाचा गंभीर प्रकार उघड — सोमेश्वरवाडीत मतदानासाठी पैसे वाटप करताना बाबुराव चांदेरे याच्या मुलासह 15 जणांवर गुन्हा दाखल

बाणेर : सूस–बाणेर–पाषाण प्रभाग क्रमांक ९ मधील सोमेश्वरवाडी येथील कल्पना नगर परिसरात मतदानासाठी पैसे वाटप सुरू असतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे पुत्र किरण चांदेरे यांच्यासह एका महिलेसह एकूण 15 जणांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बाणेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते रात्री उशिरा मतदारांची यादी तयार करून पैसे वाटप करत असल्याची माहिती अपक्ष उमेदवार प्रमोद निम्हण यांच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर तातडीने कल्पना नगर परिसरात जाऊन पैसे वाटप करणाऱ्या महिला व युवकांना रंगेहाथ पकडण्यात आले. संबंधित व्यक्तींना रोख रक्कम व अन्य पुराव्यांसह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.या कारवाईदरम्यान पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळातील कर्मचारी देखील पैसे वाटपामध्ये सहभागी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, त्यामुळे प्रकरणाला अधिक गंभीर वळण लागले आहे.

बाणेर–बालेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात प्रभागाच्या बाहेर वास्तव्यास असलेले मतदार असून, त्यांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून मतदार यादीतील नावे शोधून पैसे वाटप केले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर बाणेर पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.पोलिसांनी कारवाईदरम्यान पैसे वाटपासाठी वापरण्यात आलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांची झडती घेऊन संबंधित वाहने ताब्यात घेतली आहेत.

तसेच बाणेर–बालेवाडी परिसरातील कबड्डी संघातील खेळाडूंचा वापर करून त्यांच्या गावाकडील मतदान बाणेर–बालेवाडीच्या मतदार यादीत नोंदवण्यात आल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला आहे. प्रभागाबाहेर राहणाऱ्या मतदारांना ये-जा करण्यासाठी व मतदानासाठी पैसे देण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतरच पाषाण परिसरातील कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी प्रमोद निम्हण, संदीप बालवडकर, जयेश मुरकुटे, विशाल विधाते, राहुल कोकाटे, नितीन चांदेरे यांच्यासह विविध पक्षांचे उमेदवार व कार्यकर्ते बाणेर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून कठोर कारवाईची मागणी करत होते.

See also  केअर इंडिया मेडिकल सोसायटीच्या वतीने कर्करोगग्रस्त रुग्णांचा मोफत इलाज;‘दिवाळी विथ अ पर्पज’उपक्रमाचे यंदा 30 वे वर्ष

दरम्यान, पैसे वाटप करणाऱ्या संबंधित उमेदवारांचा उमेदवारी अर्ज तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी यावेळी उपस्थित उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी केली आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत म्हणाले, सोमेश्वर वाडी येथील कल्पना नगर परिसरामध्ये निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.