“शरद पवारांचा निरोप थेट कार्यकर्त्यांपर्यंत; प्रभाग ९ मध्ये खासदार निलेश लंके यांचा दमदार दौरा”

बाणेर : सुस-बाणेर-पाषाण प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)चे उमेदवार जयेश मुरकुटे यांच्या निवडणूक कार्यालयाला खासदार निलेश लंके यांनी भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या भेटीमुळे परिसरातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
यावेळी खासदार निलेश लंके म्हणाले, “तू काही काळजी करू नकोस रे, मी आहे. साहेबांचा निरोप सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, महाळुंगे, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी परिसरातून अवघ्या २४ वर्षांचा जयेश मुरकुटे हा तरुण उमेदवार पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)कडून उतरला आहे. या तरुण उमेदवाराच्या पाठीशी पक्षाने संपूर्ण ताकद उभी केली असल्याचे चित्र या भेटीतून स्पष्ट झाले.

खासदार निलेश लंके यांनी जयेश मुरकुटे यांच्या कार्यालयात महिला, युवक तसेच पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्याशी सखोल संवाद साधला. तसेच परिसरातील स्थानिक प्रश्न, नागरिकांचे प्रमुख मुद्दे आणि प्रचार यंत्रणेची सद्यस्थिती याबाबत उमेदवार जयेश मुरकुटे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)चे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीमुळे प्रभाग क्रमांक ९ मधील निवडणूक प्रचाराला अधिक गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.

See also  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड