पुणे : पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं की, देखाव्यांची परंपरा आलीच. मग त्यामध्ये हालते देखावे, जिवंत देखावे, धार्मिक, प्रबोधनात्मक, सामाजिक आदी विषयांवर देखावे सादर करण्याची मोठी परंपरा आहे. घरगुती गणेशोत्सवही याला अपवाद नाही. सुभाषनगरमधील जेधे कुटुंबाने असाच एक अफलातून देखावा सादर केला आहे. जिथे उंदीरमामांची शाळा भरली असून, सर्व मूषक विद्यार्थी झाले आहेत, तर मास्तर बनले आहेत साक्षात ६४ कलांची देवता असलेले गणपती बाप्पा!
सामाजिक कार्यकर्ते कान्होजी जेधे यांच्या घरी हा गणपती बाप्पाचा देखावा साकारला आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा आणि शिक्षणाचे महत्व अधोरेखित करणारा संदेश यातून देण्यात आला आहे. शाडूच्या मातीपासून शिक्षकाच्या वेषातील गणपती बाप्पा, विद्यार्थी रूपातील मूषक, बाकडे, फळा, खडू, पेन्सिल अशा साहित्याचा वापर यात केला आहे. शाळेच्या भिंतीवर विविध सामाजिक संदेश देण्यात आले आहेत. असा हा मूषक विद्यार्थी व मास्तर बाप्पाचा देखावा पुणेकरांना खुणावत आहे.